Tuesday, 10 October 2017

|| समकालीन चर्चापद्धती व त्यांतील काही दोष ||

|| समकालीन चर्चापद्धती व त्यांतील काही दोष ||

सोशल मीडियाचा वापर क्रमाने वाढत आहे. त्याचा वापर केवळ मनोरंजनापुरता मर्यादित राहिलेला नसून आता तिथे गंभीर चर्चासुद्धा चालतात. सध्या सोशल मिडीयात ज्या चर्चा चालतात, त्या चर्चेच्या पद्धतीविषयी मला काही आक्षेप नोंदवायचे आहेत. हा लेख लिहिताना माझ्या डोळ्यासमोर मुख्यत: समकालीन व ऐतिहासिक प्रश्नावर चालणाऱ्या चर्चा अभिप्रेत आहेत. सोशल मिडीया म्हणताना मी व्हॉटस्अॅप, फेसबुक आणि ब्लॉग यावर चालणाऱ्या चर्चा गृहीत धरलेल्या आहेत. या माध्यमातून चालणाऱ्या चर्चांची खोली क्रमाने वाढत आहे. विशेषतः फेसबुक आणि ब्लॉग या माध्यमांची. उदाहरणच द्यायचे झाले तर असे देता येईल की, समजा शिवकालावर काही चर्चा सुरु आहे. तर मंडळी केवळ इतिहासकारांचे संदर्भ देऊन थांबत नाहीत तर कोणत्या मूळ साधनात (source) काय म्हटले आहे याचे संदर्भ ते देतील. जेधे शकावली अधिक विश्वसनीय आहे की शिवभारत यावर हिरीहिरीने चर्चा करतील. अमुक एक पत्र आता कसे बनावट ठरले आहे, हे कोणीतरी सांगेल तर ते अस्सल असल्याचे कुणी तरी पटवून देण्याचा प्रयत्न करील. अर्थात सर्वच मंडळी या पातळीवरून बोलतात असे नाही. सोशल मिडीयावर सर्व प्रकारचे लोक असतात. सोशल मिडीयाचे आणखीन एक वैशिष्ट्य असे की तिथे सर्वांना समान संधी असते. अभ्यास नाही अथवा कमी आहे म्हणून त्याने चर्चेत भाग घेऊ नये, असा काही नियम नाही. एखादा मोठा विचारवंत असो की सामान्य माणूस संधी समानच!
पहिला मुद्दा भाषेचा. बरीच मंडळी नीट मराठी लिहित नाहीत, असे मला वाटते. मी हे टायपींगमध्ये होणाऱ्या चुकांविषयी बोलत नाही. तसेच पहिली वेलांटी की दुसरी अशा चुकांविषयीही बोलत नाही. (प्रस्तुत लेखकाचेही शुद्धलेखन वाईटच आहे.) तसेच भाषा ग्रामीण की शहरी याविषयीसुद्धा मला काही म्हणायचे नाही. बऱ्याच वेळी वाक्याची रचनाच सदोष असते. शब्दांच्या वापराविषयी कित्येक वेळा असे लक्षात येते की 'तो' विशिष्ट शब्द वापरताना त्याच्या अर्थाच्या विविध 'छटा' लक्षात घेतल्या जात नाहीत. एखादा मराठी शब्द अथवा त्याच्या विविध छटा नीट न समजल्यास मराठी शब्दकोश उघडून पाहणं अथवा एखाद्या अधिकारी व्यक्तीकडून तो समजावून घेणं हा नित्य साधनेचा भाग असला पाहिजे. कारण भाषाच कच्ची राहिली तर कोणत्याही विषयाच्या अभ्यासाचा प्रारंभ होणे सुद्धा अशक्य आहे.
आणखी एक आक्षेपार्ह गोष्ट म्हणजे मोठे मोठे शब्द वापरण्याचा हव्यास. उदा. गाढे अभ्यासक, दिग्गज हे शब्द कित्येक वेळा गरज नसताना वापरले जातात. खरं तर बऱ्याचदा त्याची काहीच गरज नसते. साध्या, सरळ नि सोप्या शब्दांनी काम भागण्यासारखे असते.
अजून एक शंका मला अशी येते की कित्येक मंडळींचं लिखाण केवळ चुकीच्या अथवा भ्रष्ट अनुवादामुळे दुर्बोध झालेले असते. (किती तरी वेळा आपण मराठीतून इंग्लिश तर वाचत नाही आहोत ना, अशी शंका येत राहते.) मोठमोठ्या संकल्पना नि थिअरींचा हव्यास सोडला तर ते लिखाण कदाचित काही प्रमाणात सुलभ नि सुसह्य होउ शकले असते, असे वाटत राहते.
लिहिण्याच्या पद्धतीचा एक गंमतीदार भाग असा की बरीच मंडळी एका परिच्छेदात खूप सारे मुद्दे कोंबतात. त्यातून होतं काय की, कोणत्याच मुद्द्याला न्याय मिळत नाही. त्या भाष्यातून विविध मुद्द्यांविषयी तुमची 'मतं' कळतात, पण मुद्दे 'सिद्ध' मात्र होत नाहीत. उदा. असहिष्णुतेविषयी काही सांगायचे असेल तर अगदी चार्वाकांपासून ते नरेंद्र दाभोलकरांपर्यंत पंधरा वीस उदाहरणे एकाच परिच्छेदात दिली जातात. त्यातली सर्वच उदाहरणे सर्वांना पटण्यासारखी असतात, असेही नाही. त्यापेक्षा कमी मुद्द्यांवर तपशीलात लिहिणे अधिक चांगले. अर्थातच मुद्दा पुरेशा पुराव्याने नि तर्कसंगत युक्तीवादाने 'सिद्ध' करणं अधिक महत्त्वाचं!
सोशल मिडीयावर आढळणारा अजून एक दोषास्पद प्रकार म्हणजे कॉन्स्पिरसी थिअरीची लागण. वर दिलेले असहिष्णुतेचेच उदाहरण घेऊ. एकाच परिच्छेदात पंधरा वीस उदाहरणे दिली जातात. त्यात चार्वाक, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, छ. शिवाजी, संभाजी राजे ते नरेंद्र दाभोलकर इ. विविध कालखंडातील बरीच नावे असतात व या सर्वांची सरसकटपणे हत्या झाल्याचे सांगितले जाते. त्यावरून पुरोगामी विचारवंतांची हत्या करण्याची परंपरा आपल्याकडे कशी पूर्वापार आहे, हे ठासून सांगितले जाते. हे एक प्रकारचे सामान्यीकरण असते. यात काही उदाहरणे खरी, काही वादग्रस्त तर काही चक्क खोटी असतात.
कित्येकदा एखादी साधी गोष्ट सांगताना त्यात भरपूर पारिभाषिक संकल्पना नि कित्येक भिन्न भिन्न विचारव्यूह यांचा मारा केला जातो. यातून दोन चुका घडतात. एक तर त्या संकल्पना व विचारव्यूह पुरेशा काटेकोरपणे वापरलेले नसतात. दुसरा मुद्दा म्हणजे त्या सर्व संकल्पना नि थिअरींच्या गोंधळात तपशील हरवलेला असतो. अगोदर एखादा तपशील वाचकांपर्यंत नीट पोहोचवून नंतर त्यावर भाष्य करावे, असे केले जात नाही. त्यामुळे भाष्य तर वाचकांपर्यंत पोहोचते; पण ज्या तपशीलांवर ते उभे आहे तो तपशील मात्र पोहोचत नाही. याला एक कारण कदाचित असं असू शकेल की, सध्या अन्वयार्थाच्या तुलनेत तपशीलाचे इतके अवमूल्यन झाले आहे की, तो नीट सांगण्याची गरजच फारशी कोणाला वाटत नाही. कधी कधी तर अशीही शंका येते की ‘हे’ सर्व आम्हाला ‘अवगत’ आहे, असं दाखवायचं आहे की काय?
अजून एक दोष म्हणजे अमुक एका विचाराची योग्यायोग्यता त्या विचाराची चिकित्सा करून न ठरवता तो कुठुन आला आहे, कुणी मांडला आहे इ. मुद्द्यांवरून ठरविणे. जणु काही त्या विचारावर त्या त्या भागाचा, व्यक्तीचा किंवा संघटनेचा शिक्का मारलेला आहे!
काही लोकांस हेत्वारोपाची घाई झालेली असते. फार लवकर मंडळी समोरच्यावर हेत्वारोप करून रिकामी होतात. त्यातून समोरच्याचे म्हणणे सहानुभुतीपूर्वक समजूनच घेतले जात नाही. याच्या पुढची अवस्था म्हणजे एखाद्याला कुणाचा तरी 'हस्तक' म्हणून हिणवणे. या गोष्टींमुळे झालेय काय की मंडळी विशिष्ट मुद्द्यांविषयी प्रश्न विचारायला अथवा मतभेद व्यक्त करायला पण घाबरू लागली आहेत. उदा. काही गोष्टींबाबत प्रश्न विचारले अथवा मतभेद व्यक्त केले तर लोक आपल्याला ब्राह्मणी किंवा हिंदुत्ववादी म्हणतील की काय याचे टेन्शन असते. परिणामी खुलेपणाने चर्चा न होता साचेबद्ध चक्रातच मुद्दे फिरत राहतात. आणि मग कित्येक मुद्दे 'अवाजवी' बहुमताने संमत होतात.

हेत्वारोपाचाच पुढील विस्तार म्हणजे 'अनुक्त हेत्वारोप' होय. ('अनुक्त हेत्वारोप' हा शब्द श्री राजीव साने यांनी घडविला आहे.) म्हणजे असे की एखाद्याने जे लिहिले अथवा बोलले आहे, त्यावर लक्ष केंद्रित न करता त्याने न लिहिलेल्या अथवा न बोललेल्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून हेत्वारोप करणे. यासाठी एकावर एक अशी अनुमानांची चवडच रचली जाते. इथे हे लक्षात घ्यायला हवे की बोलल्या गेलेल्या गोष्टी नेहमी सान्त असतात; तर न बोलल्या गेलेल्या गोष्टीं अनंत असू शकतात. त्यामुळे 'हा' मुद्दा बोलला गेला तर 'तो' का नाही बोलला गेला, या म्हणण्याला फारसा अर्थ नसतो. काही जण तर अनुमानाच्या हनुमान उड्या मारत याच्याही पुढे जातात; नि न बोललेल्या मुद्द्यांविषयी सदर व्यक्तीचे मत कसे 'चुकीच्या' दिशेनेच जाणारे असू शकते, हे छातीठोकपणे सांगू लागतात.
आता तत्त्वत: हे मान्य करावे लागेल की अमुक लेखकाने तमुक मुद्दा जाणीवपूर्वक गाळला, अशी स्थिती असू शकते. पण मग तिथे आपल्याला अमुक लेखनात तमुक मुद्दा येणे कसे 'अनिवार्य' होते हे 'सिद्ध' करून दाखवावे लागेल. अडचण हीच आहे की आरोप खूप जण करतात, पण तो 'सिद्ध' करण्याची जबाबदारी मात्र अपवादानेच कुणी तरी स्वीकारते.
व्यत्यास खरा मानणे हा सुद्धा दोष आपल्याला इथे पहावयास मिळतो. उदा. समजा परंपरेचे अनुसरण करणारी एक विचारधारा आहे. तिला आपण प्रतिगामी विचारधारा म्हणू या. या विचारधारांवर टीका करणाऱ्या, त्याची चिकित्सा करणाऱ्या ज्या विचारधारा असतात त्यास पुरोगामी विचारधारा म्हणण्यात येते. पण चर्चेत बऱ्याचदा घडते काय की एखादा पुरोगामी विचारधारेची चिकित्सा करू लागला की, काही लोक त्यास प्रतिगामी ठरवून मोकळे होतात. इथे एक सोपे सूत्र वापरले जाते. ते म्हणजे प्रतिगामी विचारधारेची चिकित्सा करणारा तो पुरोगामी आणि पुरोगाम्यांची चिकित्सा करणारा तो प्रतिगामी! खरं म्हणजे पुरोगामी विचारांची चिकित्सा करणारा प्रतिगामी असेलच असे नाही. निदान तसे ठरायला नको. व्यत्यास खरा मानण्यात वैचारिक घोटाळा हा असतो की, तिथे दोनच पर्याय उपलब्ध आहेत, असे गृहीत धरले जाते; की जे खरे नाही. त्यामुळे व्यत्यास नेहमीच खरा असेल असे नाही.
कित्येकांना अभाववाचक विधाने करण्याची सवय असते. उदा. “गांधीजींनी अमुक एक विचार कधीच मांडला नाही.” आता इथे हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, ‘गांधीजींनी अमुक एक विचार मांडला’ असे विधान करणे फार सोपे आहे. कारण त्यासाठी गांधीजींचा एखादा लेख, भाषण किंवा चरित्र वाचणे पुरेसे आहे. पण अमुक विचार कधी मांडला नाही, असे विधान करण्यासाठी मात्र प्रचंड अभ्यास करावा लागेल. अशा प्रकारचं विधान करण्यासाठी त्यांचं समग्र व़ाड्मय, चरित्रं, आठवणी इ. सर्वच गोष्टी वाचाव्या लागतील. एखादा अधिकारी अभ्यासकच असे विधान करू शकेल.
काही फेसबुकीय विद्वानांना सारभूत विधानं करण्याची सवय असते. ते कित्येकदा फार मोठ्या कालखंडावर एका वाक्यात भाष्य करतात. उदा. ‘अहिंसावादामुळे गेली दोन हजार वर्षे भारताचे नुकसान होत आहे.’ खरं तर असे विधान करण्यासाठी फारच अभ्यास करावा लागेल. अशी फार मोठ्या कालखंडावर पकड असणारे इतिहासकार पण अपवादानेच आढळतात. आर. सी. मजुमदार हे एक असे विरळा इतिहासकार होते. अर्थात मजुमदारांइतका अभ्यास करा आणि मगच बोला असे इथे सुचवायचे नाही. पण अशी विधानं करताना आपल्याला आपल्या मर्यादांची जाणिव हवी. असे विधान करताना दोन हजार वर्षांच्या इतिहासाचा ‘किमान’ तपशील आपल्याला माहिती हवा. या कालखंडावर इतिहासकारांनी लिहिलेले महत्त्वाचे ग्रंथ वाचलेले असले पाहिजेत. एवढ्या मोठ्या कालखंडावरील अस्सल साधने अभ्यासणे फारच अवघड आहे. तेंव्हा अशी विधानं केलीच तर अतिशय जपून आणि नम्रपणे करायला हवीत. आता आणखी एका महत्त्वाच्या वाद-दोषाकडे वळू या. तो म्हणजे अखंडनीय विधाने करणे. कार्ल पॉपर यांनी 'शास्त्रीय' विधानाची कसोटी सांगितली आहे. त्यांच्या मते एखादे विधान खंडनीय असेल व अद्याप खंडित झालेले नसेल, तर ते विधान शास्त्रीय होय. म्हणजे विधान कोणकोणत्या प्रकारे खंडित केले जाऊ शकेल, याचा निकष विधान करणाराला पुरवता आला पाहिजे. उदा. समजा मी एखाद्या इतिहासातील घटनेविषयी तपशीलवजा विधान केले. तर ते विधान कोणत्या तरी पुराव्यावर आधारित असते (निदान असायला हवे.) मग ते विधान खोटे कधी ठरेल तर जेंव्हा एखादा नवा अधिक विश्वासार्ह पुरावा समोर आला तर किंवा जुना पुरावाच बनावट आहे, असे कुणी सिद्ध केले तर. अशा प्रकारे विधान खंडित होउ शकणारे निकष पुरवणं ही विधान करणाराची जबाबदारी आहे. बऱ्याचदा विशेषत: ‘थिअरी’वाली मंडळी अशी विधानं करतात की त्याविरुद्ध कितीही पुरावा दिला तरी ती खंडित होत नाहीत. जणु काही 'थिअरी' ही गोष्ट अपौरुषेय असते. अर्थातच अशी विधानं अशास्त्रीय असतात.
आता एक शेवटचा दोष. कित्येक मंडळी विधानं करत असताना ती अनाठायी आक्रमकपणे करत असतात. मला वाटतं आपल्याला हे भान असणं आवश्यक आहे की जे विधान आपण करत आहोत ते नेमके कशावर आधारलेले आहे. एखादा विषय असा असू शकेल की त्या विषयातील मूलभूत ग्रंथ आपण वाचलेले असू शकतील. त्याचे मूळ पुरावे आपल्याला माहिती असतील. त्याविषयी केली गेलेली चर्चा, विविध दृष्टीकोन आपल्याला अवगत असतील. मूळ पुराव्यांची ग्राह्याग्राह्यता, वेगवेगळ्या दृष्टीकोनांची योग्यायोग्यता आपण चिकित्सक मूल्यमापन करून ठरविलेली असेल व त्यावरून स्वत:चे काही मतही बनविलेले असेल. पण असे किती विषयांबाबत (खरं म्हणजे मुद्द्यांबाबत) असू शकेल? असलाच तर एखादा! एखादा विषय असाही असेल की त्याविषयी चार बुकं आपण वाचलेली असतात. त्यातही ते ग्रंथ जर अधिकारी व्यक्तींनी लिहिलेले असतील, तर आपल्याला त्या विषयाची बऱ्यापैकी ओळख होउ शकते. असेही काही बोटावर मोजण्याइतके विषय असू शकतात. पण जगात असे अनेक मुद्दे असतात की त्याची आपल्याला जुजबी माहिती असते. पण बहुतांश मंडळी जगातील यच्चयावत विषयांवर सारख्याच अधिकार वाणीने भाष्य करीत असतात. निदान ज्या विषयात आपल्याला कमी माहिती आहे त्या विषयांवर मत व्यक्त करताना ते फाजील आक्रमक तर होत नाही ना, याची काळजी घ्यायला हवी. ती विधानं अधिक काळजीपूर्वक, नम्र भाषेत नि सावधपणे करायला हवीत. अनाठायी आक्रमकपणा काय कामाचा?
हे मला दिसलेले काही महत्त्वाचे दोष आहेत. या क्षेत्रातील जाणकारांना आणखीही काही दिसू शकतील. मला वाटतं जर वरील दोष आपण टाळू शकलो तर चर्चा अधिक काटेकोर, तर्कशुद्ध व निर्द्वेष पद्धतीने करू शकू. व सोशल मिडीयातील चर्चेची खोली वाढविण्यास आपला हातभारही लागेल.
(पूर्वप्रसिद्धी – नवभारत ऑगस्ट २०१७)
लेखक - प्रा. संतोष शेलार
इतिहास विभाग, कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे महाविद्यालय, सटाणा.

Monday, 9 October 2017

भयग्रस्त पुरुषाची मुक्तता

                                                                                                                          - संतोष शेलार 
                                                                                                              

खरंच पुरुष घाबरट असतात का किंवा घाबरलेले असतात का? या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी आहे. पुरुष हे स्त्रियांच्या तथाकथित लैंगिक क्षमतेला ‘आतून’ घाबरलेले असतात. त्यांना असं वाटतं की, स्त्रियांची लैंगिकता म्हणजे काही तरी अफाट प्रकरण आहे. त्यापुढे आपण ‘पुरुष’ म्हणून टिकाव धरू शकू की नाही, याबद्दल तो साशंक असतो. ही भीती आजची नाही, फार प्राचीन काळापासून आहे...



लेखाचं शीर्षक वाचूनच असं वाटण्याची शक्यता आहे की भयग्रस्त असेल तो पुरुषच कसला! कारण आपल्या परंपरेने ‘पुरुष’ नावाचा जो सांस्कृतिक साचा बनवला आहे, त्यात पुरुषाला घाबरायला बंदी आहे. पुरुष कसा निर्भय, कणखर नि पराक्रमी असायला हवा, असं आपल्याला हा साचा शिकवतो.


अर्थात परंपरेने कितीही ‘पुरुष’ घडवण्याचा प्रयत्न केला तरी वस्तुस्थिती फारशी बदलत नाही. किंबहुना अशा प्रकारे ‘पुरुष’ घडवावे लागतात, यात सर्व काही आले. खरंच पुरुष असे घाबरट असतात का किंवा घाबरलेले असतात का? या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी आहे. पुरुष हे स्त्रियांच्या तथाकथित लैंगिक क्षमतेला ‘आतून’ घाबरलेले असतात. त्यांना असं वाटतं की, स्त्रियांची लैंगिकता म्हणजे काही तरी अफाट प्रकरण आहे. त्यापुढे आपण ‘पुरुष’ म्हणून टिकाव धरू शकू की नाही याबद्दल तो साशंक असतो. या क्षमतेचं मिथक दोन प्रकारे पुढं येतं. एक म्हणजे स्त्रियांची कामभावना फार जास्त आहे म्हणजे असं की त्यांना वारंवार कामेच्छा होते. आणि दुसरं म्हणजे तिची लैंगिक क्षमताच अशी अफाट आहे की सहजासहजी तिची कामपूर्ती होणंच अशक्य! या धारणांचा परिणाम असा होतो की स्त्रीची कामपूर्ती आपण करू शकू की नाही, समजा नाही करू शकलो तर ती अन्य पुरुषांकडे आकर्षित तर होणार नाही ना, या भीतीखाली ते जगत असतात.
बरं, ही भीती आजची नाही, फार प्राचीन काळापासून आहे. उदाहरणार्थ आपले स्मृतिकार मनुमहाराज स्त्रियांविषयी काय लिहितात ते पाहा, ‘स्त्रियांची कामभावना अनिवार असते’ ‘प्रजापतीने स्त्रियांचा स्वभावच असा घडवला आहे की, पुरुष म्हटला त्यांस हवासा वाटतो, त्यात त्या पुरुषांचे वय अथवा रंगरूप पाहत नाहीत’ ‘स्त्रियांना त्यांच्या विषयासक्तीपासून रक्षिण्यासाठी रात्रंदिवस पुरुषांनी त्यांना आपल्या अधीन ठेवावे’ या सर्व विचारांतून मनु महाराजांनी स्त्रियांवर काय अन्याय केला, हा प्रश्न जरा बाजूला ठेवूया. या विचारांकडे नीट पाहिले तर लक्षात येईल की यातल्या वाक्यावाक्यातून पुरुषांच्या मनातली स्त्रीच्या लैंगिकतेविषयी असलेली भीती प्रकट झालेली आहे. या भीतीचे पडसाद जसे परंपरा-समर्थक वाङ्मयात उमटलेले आहेत, तसे परंपरेविरुद्ध विद्रोह करणाऱ्या वाङ्मयातही उमटलेले आहेत. चार्वाकांनी असे म्हटले आहे की, ‘पातिव्रत्य’ हे मूल्य चलाख व ‘दुबळ्या’ पुरुषांनी निर्माण केले आहे.’ यातले ‘दुबळ्या’ हे विशेषण चार्वाकांची मर्मदृष्टी स्पष्ट करणारे आहे. प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत ही अशीच परिस्थिती आहे. इंग्रज काळात जेव्हा स्त्री-शिक्षणाचा मुद्दा पुढे आला तेव्हा परंपरावादी पुरुषांनी असा युक्तीवाद केला की, ‘स्त्रिया शिकल्यास पर पुरुषास प्रेमपत्रे लिहितील.’ म्हणजे इथेही ‘ती’च भीती पुरुषांच्या मनात होती हे उघड आहे.
पुरुषांच्या मनातल्या स्त्रियांच्या लैंगिकतेविषयीच्या भीतीचे दोन भिन्न दिशेने गंभीर परिणाम झाले आहेत. पैकी एक दिशा म्हणजे लैंगिक बाबतीतल्या फसव्या औषधोपचारांच्या नादी लागणे. बहुतांश पुरुषांना असे वाटते की मोठ्या ‘आकारा’शिवाय नि जास्त वेळ ‘टिकल्या’शिवाय आपण स्त्रीची कामपूर्ती करू शकणार नाही. त्यामुळे ‘आकारा’ला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. मुलं मुलं एकत्र आली की तिथे लैंगिक विषयावरील चर्चा नेहमीच चालते, यात आश्चर्यकारक काही नाही. पण तिथे नेहमी चर्चिला जाणारा एक मुद्दा म्हणजे लिंगाचा आकार नि संभोगाचा कालावधी तसेच या दोन्हींमध्ये वाढ होण्यासाठी असणारी तथाकथित औषधे! या भयगंडाचाच आणखी एक परिणाम असा की या गंडामुळे पुरुष आपल्या साथीदाराबरोबर निरोगी लैंगिक संबंध ठेवू शकत नाहीत. कारण ते समागमाकडे ‘परफॉर्मन्स’ म्हणून पाहतात!
दुसऱ्या दिशेने झालेला परिणाम अधिक गंभीर आहे. भयग्रस्त प्राणी कित्येकदा आक्रमक बनण्याची शक्यता असते. आपली भयग्रस्तता लपवण्याच्या नादात पुरुष विलक्षण आक्रमक बनला आहे. स्त्रीला धाकात ठेवणे, प्रसंगी अत्याचार करणे हे त्याच्या ‘मर्द’पणाचे लक्षण बनले आहे. त्यातून स्त्रियांना घरातच ठेवण्यापासून ते बुरख्यापर्यंत विविध प्रथांना बळ मिळाले आहे. यातून स्त्रियांना काय काय त्रास होतो हा आज आपला विषयच नाही. पण पुरुषांना मात्र याचे तोटे भोगावे लागतात. तो स्वत:च्या ‘माणूस’पणाला व कित्येक तरल भावनांना मुकला आहे. आक्रमकता या पुरुषी मूल्याचं ओझं त्याला वागवावं लागतं.
खरं तर स्त्रीची कामभावना फार अफाट असते हे मिथकच आहे. आपण फार तर असं म्हणू शकतो की स्त्रीची लैंगिकता पुरुषांपेक्षा काहीशी भिन्न आहे. बस्स. पण या एका मिथकावर पुढची बरीच मिथकं उभी राहिली आहेत. ‘आकार’ नि ‘कालावधी’ यांचा बाऊ हा त्याचाच पुढचा भाग. खरं तर लैंगिक सुखात आकाराचं लहान-मोठेपण हा मुद्दाच नसतो. आणि कालावधीचं म्हणाल तर निसर्गाच्या पुढे फार जाता येत नाही. लैंगिक सुखात महत्त्वाची गोष्ट ठरते ती, एकमेकांविषयी असलेली ओढ आणि योग्य लैंगिक ज्ञान. केवळ या ज्ञानाच्या अभावीच हे पुरुष बिचारे, भयग्रस्त बनले आहेत.

‘पुरुष’ नावाच्या सांस्कृतिक साच्यातून समग्र मुक्त होण्याची प्रक्रिया ही दीर्घकालीन प्रबोधनानेच घडून येईल. मात्र या भयगंडातून मुक्त होण्यासाठी केवळ योग्य लैंगिक शिक्षणाची काय ती आवश्यकता आहे.
मार्च महिन्यात आपण ‘महिला दिन’ साजरा केला. त्या वेळी स्त्री-मुक्तीविषयी खूप काही लिहिले गेले. पण मुक्तीची आवश्यकता जशी स्त्रियांना आहे तशी पुरुषांनाही आहेच. नाही तरी आपण म्हणतोच ना की, स्त्री आणि पुरुष हे समानच असतात! परंतु त्यातल्या त्यात पुरुष हे अधिकच समान असतात, असे आमचा ‘आतला’ आवाज सांगत असल्याने आज पुरुषांच्या भयमुक्तीविषयी लिहिले आहे.
लेखकाचा संपर्क : santoshshilahar@rediffmail.com
  • प्रथम प्रकाशित वर्तमानपत्र 'दिव्य मराठी'  रसिक पुरवणी  दिनांक २१ मे  २०१७

Tuesday, 21 March 2017

आगरकरांचे आर्यत्व

१९ वे शतक हे भारतीय इतिहासातील प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते. इंग्रजी राजवटीबरोबर येथे आलेल्या प्रगत अशा पाश्चात्य संस्कृतीने भारतीय संस्कृतीतील आचार विचारांना तीव्र धक्के दिले. त्याची प्रतिक्रिया व प्रतिसाद म्हणून भारतात प्रबोधनाला सुरवात झाली. या काळात जे सुधारक निर्माण झाले त्यात आगरकरांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे.

आगरकर हे बुद्धिप्रामाण्यवादी सुधारक होते. भारतात राजकीय, सामाजिक, धार्मिक इ. सर्वांगीण सुधारणा एकाच वेळी व्हाव्यात असे त्यांना वाटे. आगरकर हे कट्टर राष्ट्रवादी होते. राष्ट्रावादात आपल्या पूर्वजांचा इतिहास, धर्म, परंपरा, संस्कृती इ. गोष्टींचा अभिमान वाटणे आवश्यक मानले गेलेले आहे. आगरकरांनाही असा अभिमान वाटतो. हिंदू धर्म, हिंदू समाज यांचा व आपण हिंदू असल्याचा त्यांना अभिमान आहे. त्यांचे सामाजिक विचार, त्यांचे राजकीय विचार, त्यांची धर्म व धर्मांतरविषयक भूमिका, राष्ट्रवाद, हिंदू – मुस्लीम प्रश्नाचे त्यांचे आकलन इ. बाबतीत त्यांनी आपले वैशिष्ट्यपूर्ण विचार प्रकट केलेलं आहेत. आगरकरांचा रूढार्थाने कोणत्याही धर्मावर विश्वास नव्हता. कोणताही धर्मग्रंथ अगर परंपरा ते प्रमाण मानत नसत. ते ईश्वरालाही मनात नसत. याबाबतीत ते अज्ञेयवादी होते. असे असूनही हिंदू हे हिंदूच राहिले पाहिजेत असे त्यांना वाटते. आपले आर्यत्व किंवा हिंदूपण टिकले पाहिजे असे त्यांना वाटते. त्यांची हि भूमिका नीट समजून घेण्यासाठी त्यांचे धर्म, हिंदू समाज, धर्मांतर, राष्ट्रवाद, हिंदू – मुस्लीम समस्या याविषयीचे विचार समजून घेणे महत्वाचे आहे.

आगरकरांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरु करताना जे जाहीर पत्रक काढलेले होते, त्यातच त्यांनी आपली ‘आर्यत्व’ जपण्याची भूमिका स्पष्ट केलेली आहे. या पत्रात आगरकरांनी अगदी थोडक्यात इतिहासाचा आढावा घेतला आहे. यापुढे आपण काय केले पाहिजे याचे दिग्दर्शन केले आहे. या पत्रकात आगरकर म्हणतात, “मुसलमाना लोक आम्हाहून म्हणण्यासारखे सुधारले नव्हते. म्हणून त्यांच्या अंमलात आम्ही अगदीच नष्ट झालो नाही. पण सध्या ज्या लोकांचा अंमल आपणावर आहे त्यांच्या व आमच्या सुधारणेत बहुतेक बाबतीत जमीन अस्मानाचे अंतर असल्यामुळे त्यांच्यातील अनुकरण करण्यासारख्या गोष्टी आम्ही उचलल्या नाहीत व जे जुने व घरचे ते सारे चांगले हा हेका धरून बसलो तर उत्तर अमेरिकेतील इंडियन लोकांप्रमाणे आपली दशा होईल. हा भयंकर प्रसंग आपणावर न यावा व भारतीय आर्यत्व नष्ट न व्हावे हे इष्ट असेल तर .... जीवनार्थ कलहात आमचा निभाव कसा लागेल हे शोधून काढून तद्नुसार वर्तन करण्यास प्रवृत्त झाले पाहिजे.” (१-१,२) या उताऱ्यात आगरकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच येथे ‘आम्ही’ हा जो राष्ट्रावाचक शब्द वापरताना आगरकरांना हिंदू समाजच अभिप्रेत आहे. त्यांचे आर्यत्व म्हणजे हिंदुत्वच आहे. ‘सुधारक काढण्याचा हेतू’ या आपल्या पहिल्याच लेखात आगरकरांनी हीच गोष्ट स्पष्ट केली आहे. ते लिहितात, “हिंदू लोक रानटी अवस्थेतून निघाल्यावर काही शतकेपर्यंत राज्य, धर्म, नीती वगैरे काही शास्त्रे, वेदांत, ज्ञान काही विद्या व काव्य, गीत, नर्तन, वादनादी काही कला यात त्याचे पाउल बरेच पुढे पडल्यावर त्यांची सुधारणेची वाढ खुंटली व तेव्हापासून इंग्रजी होईपर्यंत ते कसेतरी राष्ट्रत्व सांभाळू राहिले!” (१–७,८)

इतिहासाचा असा आढावा घेऊन पुढे ते लिहितात, “येथे एवढेच सांगितले पाहिजे कि, मुळ प्रकृती म्हणजे भारतीय आर्यत्व न सांडता या पाश्चिमात्य नवीन शिक्षणाचा व त्याबरोबर या नवीन कल्पना येत आहेत त्यांचा आम्ही योग्य रीतीने अंगीकार करत गेलो तरच आमचा निभाव लागणार आहे” (१-८) आगरकरांचे हे लिखाण इतके सुस्पष्ट आहे कि त्यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही.  

आगरकरांच्या समाजकारणावरही या आर्यत्वाचा प्रभाव पडलेला दिसून येतो. अस्पृश्यतेवर प्रहर करताना ते लिहितात, “उच्च वर्गात जन्माला आलेल्या लोकांनी नीच वर्गात जन्मास आलेल्या लोकांस अपवित्र व अस्पर्श्य मानणे याहून मनुष्याच्या विचारीपणास लांच्छनास्पद अशी दुसरी गोष्ट नाही. ‘न वदेत् यावनी भाषां प्राणौ: कठगतैरपि’ एवढा ज्या महंमद याविषयी आम्हास तिरस्कार होता, त्या गोहत्या करणाऱ्या म्लेंच्छांचे व तत्समान युरोपियनांचे, राज्याधिकारामुळे आम्हास काहीच वाटेनासे होऊन, ज्यांना वैदिक धर्म शिरसावंद्य ज्यांचा धर्म व आचार हिंदू जे अनादी कालापासून हिंदुस्थानचे रहिवासी, ज्यांच्या हातून गोवध होत नाही, ज्यांना मदिरापानादी मनुष्यतेचा भंग करणाऱ्या व्यसनांचा म्हणण्यासारखा नाद नाही अशा हिंदूंचा आम्ही तिरस्कार करतो, त्यांना स्पर्श करण्यास भितो आणि त्याहून अनेक कारणांमुळे अस्पर्श्य अशा परकीयास गृढालिंगन देतो हे केवढा प्रमाद होय? यावरून कोणी असे समजू नये कि हिंदुतील श्रेष्ठ जातींनी नीच हिंदुंप्रमाणे पराकीयांचाही तिरस्कार करू लागावे, असे आमचे म्हणणे आहे. आमचे म्हणणे इतकेच आहे कि त्यांची वरच्यांशी निदान परकीयांप्रमाणे तरी वागण्यास मागे-पुढे पाहू नये.” (१-६५) आगरकरांच्या सामाजिक विचारातही हिंदुत्व डोकावते. तसेच वरील विचारातून त्यांचा आप-पर भावही स्पष्ट झालेला आहे.

आगरकर आणि धर्मांतर -

आगरकर हे धर्मांतराचे कठोर टीकाकार आणि विरोधक आहे. ते म्हणतात, “आम्ही चालू हिंदू धर्मावर कितीही तीक्ष्ण प्रहर केले तथापि आमचा देश ख्रिस्ती व्हावा हि नुसती कल्पनाही आम्हास सहन होणारी नाही. आमच्यातील अतिशूद्र लोकाना आम्ही अगदी दूर टाकल्यामुळे त्यांची एकसारखी ख्रिस्ती धर्माकडे धाव चालू आहे. ती गोष्ट आम्हास अत्यंत उद्वेगजनक आहे व या लोकांस आम्ही जवळ घेऊ लागून त्यांचा तिकडील ओघ परत फिरेल तो सुदिन असे आम्हास वाटत आहे.” (२-७४) वरील विचारांवरून स्पष्ट होते कि, धर्मांतर आगरकरांना पसंत नाही. एवढेच नव्हे तर धर्मांतरीतांना परत हिंदुधर्मात घ्यावे असे त्यांचे मत होते. बळाने धर्म लादणाऱ्यांविषयी त्यांच्या मनात राग आहे. तसेच असा अन्याय सहन करून गप्प राहणाऱ्या व सामाजिक सुधारणाबाबत सनातनी व आक्रमक भूमिका स्वीकारणाऱ्या हिंदू समाजावर ते कठोर प्रहार करतात. ते म्हणतात, “भेकड, प्रतीष्ठाखोर हिंदू लोकांनो ज्या वेळेस पोर्तुगीज लोकांनी ख्रिस्ती धर्म स्थापण्यासाठी कोकणपट्टीत तुमचे अनन्वित हाल केले तेव्हा त्यावेळी तुमचा धर्माभिमान कोठे गेला होता? विषयलंपट, निशक्त, वाचाळ बाबुंनो जेव्हा महंमदियांनी हिंदुस्थानच्या एक टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत साऱ्या हिंदू लोकास आपल्या धर्मवेडाने जर्जर करून सोडले व हिंदूंच्या मानावर असिधार ठेऊन तुम्हाकडून तुमच्या शेंड्या काढवल्या आणि तुम्हास गोमांस चारले तेव्हा धर्मरक्षणासाठी तुम्ही नुसता ओरडा तरी करावयाचा होता!” (१-१३६) स्वधर्मरक्षण करू न शकणाऱ्या व सुधाराकावर मात्र चालून जाणाऱ्या हिंदू समाजाचा धर्माभिमान खोटा आहे असे त्यांना वाटते. विचारपूर्वक केलेले धर्मांतरही आगरकरांना नापसंत आहे. पंडिता रमाबाईंविषयी आदर वाटत असूनही त्यांचे धर्मांतर करणे आगरकरांना आवडले नाही. (३-४८) “गुलामांचे राष्ट्र” या लेखात आगरकरांनी विचार स्वातंत्र्याचे महत्व सांगताना धर्मांतराचे उदाहरण दिले आहे. ते लिहितात, “बापाला वैदिक धर्म मान्य असून मुलाने आपल्या मानात बौद्ध धर्म चांगला आहे असे ठरवले तर त्याने पित्याची अवज्ञा केली असे कोणाच्यानेही म्हणवणार नाही.” (१-१७१) येथे आगरकरांनी धर्मांतर मान्य केले आहे. याच लेखात खरा सुधारक व दुर्धारक यातील फरक सांगताना आगरकरांनी परत धर्मांतराचे उदाहरण घेतले आहे. “हिंदू धर्मात बरीच व्यंगे आहे. म्हणून यहुदी, ख्रिस्ती, महंमदी किंवा अशाच प्रकारच्या दुसर्या एखाद्या धर्माचा अंगीकार करणाऱ्या मनुष्यास विचारी हि संज्ञा सहसा देता येणार नाही... ज्या देशात आपले शेकडो पूर्वज जन्मास आले, वाढले व मरण पावले, ज्या देशातील हजारो पिढ्यांनी अनेक गोष्टीत केलेल्या सुधारणांचे फळ आपणास ऐतेच प्राप्त झाले – अशा देशातील धर्माचा, रितीरिवाजाचा व लोकांचा सर्वथैव त्याग करणाऱ्या मनुष्यास खऱ्या सुधारकांची पदवी कधीही शोभणार नाही.” (१-१८३) या एकाच लेखात आगरकरांनी धर्मांतराविषयी दोन वेगवेगळ्या भूमिका मांडल्या आहेत. वरील उताऱ्यात ‘देशातील धर्माचा त्याग न करण्याविषयी उल्लेख आला आहे. त्यामुळे आगरकरांना वैदिक धर्मातून बौद्ध धर्मात होणाऱ्या धर्मांतराला विरोध नाही. कारण दोन्ही धर्म याच देशात उगम पावले आहेत. यहुदी, महंमदी, ख्रिस्ती धर्मात झालेले धर्मांतर त्यांना मान्य नाही. कारण या धर्मांचा जन्म भारताबाहेर झाला आहे. म्हणून आगरकर या धर्मांना ‘देशातील धर्म’ मानावयास तयार नाहीत. आगरकरांची हि भूमिका सावरकरांच्या ‘पुण्यभू’ या संकल्पनेप्रमाणेच आहे असे वाटते. सावरकरांनी हिंदू कोणाला म्हणावे हे सांगण्यासाठी जी सर्वप्रसिध्द व्याख्या केली आहे ती पुढीलप्रमाणे –

आसिंधुसिंधूपर्यंता यस्य भारत भूमिका |
पितृभू पुण्यभूश्चैव स वै हिंदूरिती स्मृतः || (६-१००)

आसिंधुसिंधू पसरलेली भारतभू ज्याची पितृभू व पुण्यभू आहे तो हिंदू होय. भारतात राहणाऱ्या सर्वांचीच पितृभू भारत आहे. व्यक्तीचा धर्म ज्या देशात उगम पावला अथवा जन्माला तो देश त्या व्यक्तीची पुण्यभू ठरतो. या व्याख्येमुळे वैदिक, बौद्ध व जैन इत्यादि भारतात जन्म पावलेले धर्म हिंदू ठरतात. तर मुस्लीम व ख्रिश्चन हिंदुत्वाच्या कक्षेतून वगळले जातात. आशयाच्या दृष्टीने पाहिल्यास आगरकर या विचारांबाबतीत सावरकरांचे पूर्वसुरी ठरतात. दोघांनाही या कक्षेबाहेर होणारे धर्मांतर मान्य नाही.

या विचारांना काहीसा छेद देणारे विचारही आगरकरांनी मांडले आहेत. महार, मांग वगैरे अस्पृश्यांची स्थिती हिंदू धर्मात राहून सुधारणार नाही. सवर्ण हिंदू अस्पृश्यांना समान सामाजिक हक्क द्यायला तयार होणार नाहीत असे त्यांना वाटत होते. आपली स्थिती चागली होण्यासाठी अस्पृश्यांनी ख्रिस्ती व्हावे असाही उपदेश त्यांनी एकदा केला आहे. आपण असा उपदेश का गेला याचे कारण सांगताना ते लिहितात, “आमच्या लोकांनी ख्रिस्ती व्हावे अशी आमची मुळीच इच्छा नाही ... परंतु आमच्या इच्छेपेक्षा या लोकांची स्थिती अधिक महत्वाची असल्यामुळे आम्ही मोठ्या नाखुशीने हाच खरा उपाय हे कबुल केले आहे.” (३-२१३) या विचारांवरून आगरकरांना अस्पृश्य बांधवांविषयी वाटणारी कळकळ तर स्पष्ट होते तसेच त्यांचे धोरण कुठे लवचिक होऊ शकते हेही स्पष्ट होते.

आगरकर आणि ‘हिंदू – मुस्लीम’ प्रश्न -  

हिंदू आणि मुस्लीम यांच्यात तंटे का होतात, याची आगरकरांनी सांगितलेली करणे अशी आहे – हिंदू आणि मुस्लीम यांचे आचार विचार एकमेकांपासून भिन्न आहेत. (२-४५७) या तंट्याची कारणे पुरातन आहेत म्हणजेच ती इतिहासात आहेत असेही ते म्हणतात. राष्ट्रभाषा व गोरक्षण या चळवळींची या तंट्यांचा संबंध नाही असे त्यांना वाटते. (२-४५९) “अशाने निभाव कसा लागेल?” या लेखात आगरकर म्हणतात, “मुसलमान लोक शूर व धर्मवेडे आहेत; त्यांच्या शौर्यामुळे ते हिंदुस्थानचे राज्यकर्ते झाले; हिंदू लोकांशी त्यांचे जे वारंवार भांडण होते ते त्यांच्या धर्मवेडामुळे होते. या लोकांविषयी एवढ्या गोष्टी सांगितल्या म्हणजे या विषयी सांगण्यासारखे सारे सांगितले असे होते.” (२-४७६) दंग्यात मुस्लिमांकडूनच प्रथम आगळीक होते असेही ते म्हणतात. (२-४५८) हिंदू हे जात्या गरीब आहेत, ते आपणहून कोणावर तुटून पडावयाचे नाहीत असेही ते म्हणतात. (२-४७८) आगरकरांना येथे हिंदूंची बाजू न्याय्य आहे असे वाटते. आगरकर लिहितात, “जोपर्यंत दुसऱ्या लोकांची डोकी धर्मवेडाने भणभणून गेली आहेत तोपर्यंत त्यांच्याशी संबंध पडणाऱ्या लोकांतही धर्माभिमानाचे थोडेसे वारे असले पाहिजे. नाहीतर त्यांच्या हातून स्वधर्माचे संरक्षण व्हावयाचे नाही. हिंदू लोकांचा धर्माभिमान इतक्या पुरताच आहे व तो श्लाघ्य आहे. (२-४७६) या दंग्यांविषयी ब्रिटीश अधिकारी हिंदुंना पक्षपाती वागणूक देतात कि नाही, या प्रश्नाचे उत्तर आगरकरांनी वेगवेगळ्या लेखात वेगवेगळे दिले आहे. १८९३ चे जे लेख आहेत त्यात ब्रिटिशांवर असा आरोप करणे चुकीचे आहे असे म्हंटले आहे. (२-४५३, ४५९, ४७८) तर १८९४ सालच्या लेखात आगरकरांना ब्रिटिशांविषयी अशी शंका आलेली आहे. (२-४९७,५०१) मुस्लिमांना झुकते माप देणाऱ्या ब्रिटीशांना ते बजावून सांगतात कि हिंदुंविरुद्ध मुसलमानांची मैत्री त्यांना उपयोगी पडणार नाही. ते लिहितात, “जेव्हा आम्ही हिंदू लोक ब्रिटीश पलटणींची पर्वा न करता ब्रिटीश लोकांच्या हातून आपले राज्य हिसकावून घेण्यास तयार होऊ शकतो तेव्हा त्या बरोबर त्यांना टेकू देणाऱ्या मुसलमान लोकांचाही समाचार आम्हास घेता येणार आहे.” (२-५०१) येथे मुस्लिमांवर त्यांनी अविश्वास व्यक्त केला आहे. मुस्लीम हे राजकीय चळवळीस विरोध करतात असेही त्यांनी म्हंटले आहे. (२-५००) सारेच मुस्लीम तसे नसले तरी बहुतांश तसेच आहेत असे त्यांना वाटते. (२-५००) अर्थात हिंदू व मुस्लीम यांच्यात ऐक्य व्हावे असे त्यांना मनापासून वाटते. त्यासाठी त्यांनी काही उपायही सांगितले आहेत. ते लिहितात, “दोघेही अगदी निराळ्या धर्माच्या तिसऱ्याच राष्ट्राची प्रजा झालो ... दोघांनीही आपल्या उन्नतीचा उपाय करणे जरूर आहे ... ज्याप्रमाणे पूर्ववैभवाचे स्मरण करून मुसलमानांनी आजमितीस शेखी मिरवण्यात अथवा हिंदुंशी अरेरावी करण्यात अर्थ नाही त्याप्रमाणे मुस्लिमांनी पूर्वी केलेली अनन्वित कृत्ये आठवून त्यांचा द्वेष करण्यात किंवा खिजवण्यात शहाणपण नाही.” (२-४५२, ४५३) “मुस्लीम लोकांचा खरा तरणोपाय हिंदू लोकांशी एकमत करण्यात आणि जोडीने ज्ञान, संपत्ती व राजकीय हक्क संपादण्यात आहे असे आम्हांस वाटते.” (२-४७५)

वरील सर्व विचारावरून असे वाटते कि, आगरकरांचा राष्ट्रवाद सावरकरांच्या हिंदुत्ववादासारखाच आहे. जेव्हा ते राष्ट्राचा विचार करतात तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर फक्त हिंदू समाज असतो. ख्रिश्चनांना ते परकीय मानतात, मुसलमानांवरही त्यांचा विश्वास नाही. राष्ट्रवादाची अशीच हिंदू समाज केंद्रित मांडणी सावरकरांनीही केली आहे. आपल्या ‘हिंदुत्व’ या ग्रंथात सावरकर म्हणतात, “हिंदी राष्ट्राचा मूळ पाया, आधारस्तंभ, निर्वाणीचे त्राते ‘हिंदू’ लोकच आहेत.” (६-१२१) आगरकर आणि सावरकर यांच्या विचारातील हे विलक्षण साम्य सर्वप्रथम प्रा. शेषराव मोरे यांनी प्रकाशात आणले. ते म्हणतात, “आगरकरांचे आर्यत्व म्हणजेच सावरकरांचे हिंदुत्व होय.” (५-४९३) हिंदुत्वाच्या बाबतीत आगरकर हे सावरकरांच्या गुरुस्थानी आहेत असेही मत प्रा. शेषराव मोरे यांनी व्यक्त केले आहे. (५-५००) असेच मत प्रा. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले आहे. ‘तुकाराम दर्शन’ या ग्रंथात ते लिहितात, “सावरकरांनी टिळकप्रणीत हिंदू लक्षण विद्यमान असताना हिंदुत्वाची नव्याने व्याख्या करण्याचा जो घाट घातला, तो एका अर्थाने आगरकरांनी निर्दिष्ट करून अलक्षित ठेवलेल्या मूळ प्रकृतीच्या, भारतीय आर्यत्वाच्याच लक्षणाचा प्रयत्न होता.” (४-४८४)

अलीकडील काळात एक प्रश्न नेहमी चर्चिला जाऊ लागला आहे; तो म्हणजे हिंदुत्ववादी मनुष्य बुद्धिवादी असू शकतो काय किंवा बुद्धिवादी मनुष्य हिंदुत्ववादी असू शकतो काय? दोन उदाहरणे आपल्या समोर आहेत. ज्यांनी महाराष्ट्रात बुद्धिवादाची पहिली ध्वजा उभारली, त्या आगरकरांनीच आर्यत्व किंवा हिंदुत्वाचा आग्रह धरला आहे. त्यानंतर त्यांचे शिष्य म्हणवून घेणाऱ्या सावरकरांनी स्वतंत्रपणे चिंतन करून ‘हिंदूराष्ट्रदर्शन’ निर्माण केले. त्यांच्या हिंदुत्वामुळे त्यांचा बुद्धिवादावर शंका घेतली जाते. बुद्धिवादी हा हिंदुत्वनिष्ठ असूच शकत नाही या ठाम गैरसमजामुळे आगरकरांचीही हिंदुत्वनिष्ठ बाजू प्रकाशात आली नाही.   

संदर्भ सूचना –

येथे संदर्भासाठी दोन अंकांची योजना करण्यात आली आहे. त्यातील पहिला अंक ग्रंथसूचीतील ग्रंथक्रमांक आहे, तर दुसरा त्यातील पृष्ठांक आहे. 

     १.    आगरकर वाङ्मय खंड – १, संपादक देशपांडे व नातू.
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई (१९८५)

     २.    आगरकर वाङ्मय खंड – २, संपादक देशपांडे व नातू.
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई (१९८५)

     ३.    आगरकर – य. दि. फडके, मौज प्रकाशन (१९९६)

     ४.    तुकाराम दर्शन – सदानंद मोरे, गाज प्रकाशन, अहमदनगर (१९९६)

     ५.    सावरकरांचा बुद्धिवाद : एक चिकित्सक अभ्यास – शेषराव मोरे, अभय प्रकाशन, नांदेड, (१९९२)
हिंदुत्व – वि. दा. सावरकर – मनोरमा प्रकाशन २००२

Monday, 20 March 2017

गोहत्या-बंदी : काही विचार


गेल्या काही दिवसांत 'गोहत्या' या मुद्द्यावरून काही हिंसक घटना घडल्या आहेत. कुठे गोहत्येच्या संशयावरून दलितांना मारण्यात आले, कुठे अदिवासींना मारहाण झाली तर कुठे मुस्लिम महिलांना गोमांस बाळगल्याच्या संशयावरून मारझोड करण्यात आली. या घटनांचा निषेध करावा तितका थोडाच आहे. उशीरा का होइना पण पंतप्रधानांनी केलेल्या निषेधाचेही मी स्वागतच करतो. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, ही गोरक्षक मंडळी हिंदुत्ववादी आहेत आणि सरकारही हिंदुत्ववादी ! अशा वेळी सरकारची विशेष जबाबदारी आहे, या लोकांना आवरायची.

मुळात हा जो कायदा केला आहे तोच मुळी चुकीचा आहे. व्यक्तीच्या स्वांतत्र्यावर गदा आणणारा हा कायदा करणेच मुळी अयोग्य आहे. कुणी काय खावं हे सरकारने ठरवू नये. करण्यासारखी इतर खूप कामं आहेत.
आता मला हे समजते की 'व्यक्तीवाद'  (Individualism) हे मूल्य संघाला पेलवणे अशक्य आहे. मग निदान हिंदु-संघटनाच्या दृष्टीने तरी विचार करायचा होता. ज्याला आपण 'हिंदु समाज' म्हणतो ते म्हणजे विविध जाती, पंथ, नि धर्म इत्यादींचे एक कडबोळे आहे. त्यांचे आचार-विचार परस्परभिन्न आहेत. किंबहुना काही बाबतीत ते परस्परविरोधी सुद्धा आहेत. उदा. पुर्वोत्तर राज्यातल्या कित्येक जाती परंपरेनेच गोमांस-भक्षक आहेत. अर्थात संघाने कधीही हिंदु समाज, हिंदु परंपरा, धर्म यांचा गंभीरपणे अभ्यास करण्याचा प्रयत्न केला नाही. नाही तर असले हिंदुंना विघटित करणारे कायदे त्यांनी संमत केले नसते.

या सा-या प्रकरणांचा विविध निवडणुकांत भाजपाला काय तोटा होइल, त्याची गणितं कित्येक लोकांनी मांडली आहेत; पण हिंदु समाजाचं किती भयंकर नुकसान होतं आहे, हे कुणाच्या गावीही नाही. असे दिसते की बहुतांश हिंदुत्ववाद्यांना गाय ही पूज्य वाटते. गायीला हे पावित्र्य प्राचीन काळीच प्राप्त झाले असून क्रमाने ते वाढत गेलेले आहे. म्हणून तर कित्येक राजे-महाराजे स्वत:ला 'गो-ब्राह्मण प्रतिपालक' म्हणवून घेत. कारण गाय व ब्राह्मण ही जुन्या हिंदु धर्माची प्रतिकं होत. जुन्या साहित्यात 'गो-ब्राह्मण' असा एकत्रित शब्दबंध येतो. तो पावित्र्यदर्शक असतो. ( याचा व्यत्यास म्हणजे जुन्या साहित्यात 'स्त्री-शूद्र' असा शब्दबंध येतो. तो अर्थातच हीनार्थ-दर्शक असतो.) हिंदु समाजाचे आधुनिकीकरण करावयाचे असेल तर त्याची ही जुनी प्रतिकं अर्थातच बदलावी लागतील. 'ब्राह्मण' हे हिंदु समाजाचे प्रतिक आहे, असे आता सहसा कोणी म्हणणार नाही. पण गायीविषयी मात्र अद्यापही काही हिंदुंना तसे वाटू शकते. पण आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेत या मध्ययुगीन मानसिकता उध्वस्त कराव्या लागतील. ब्राह्मणांना सर्वसामान्य मानवाच्या पंक्तीला बसावे लागेल तर गायीला पशुंच्या !

या प्रश्नाला आर्थिक बाजू पण आहे. भाकड जनावरांचे काय करावयाचे हा प्रश्न शेतक-यांसमोर आहे. सरकारने या भाकड जनावरांची कसलीही सोय केलेली नाही. या कायद्याचे समर्थक मुख्यत: मध्यमवर्गीय शहरी बांधव आहेत. त्यांच्या मनात 'गोपालना'विषयी रोमॅंटिक कल्पना असाव्यात असे वाटते. काही शेतक-यांबरोबर बोलल्यामुळे असेही समजले की, आधुनिक संकरित गायींचे जे गो-हे (बैल) असतात; त्यांचा म्हणे शेतीला काहीही उपयोग होत नाही. मग त्यांना शेतक-यांनी उगाच पोसत रहावे का, हा प्रश्न आहे.

आता शेवटचा मुद्दा म्हणजे घटनेच्या मार्गदर्शक तत्त्वातील 'गोहत्या-बंदी' कलमाचा ! गोहत्याबंदीचा विषय निघाला की या कायद्याचे समर्थक हमखास या कलमाचा हवाला देतात. हे कलम बहुदा गांधीवादी प्रेरणेतून घटनेत आले आहे. हे कलम काहीसे संदिग्ध आहे, असेही मला वाटते. ते कसेही असो, पण व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर त्यामुळे अतिक्रमण होणार असेल, तर मात्र त्या कलमात सुधारणा करायलाच हवी. त्यासाठी व्यापक सहमती निर्माण करायला हवी. कारण शेवटी माणूस महत्त्वाचा आहे, गाय नव्हे ! 

इतिहास, राष्ट्रवाद, सांप्रदायिकता आणि रोमीला थापर

रोमीला थापर हे सद्यकालीन इतिहासकारांत सर्वात सुप्रसिद्ध असे नाव आहे. केवळ इतिहासाच्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर सर्वसामान्य सुशिक्षित वाचक वर्गालाही त्यांचे नाव माहित असते. ज्यांना इतिहासाविषयी काही जिज्ञासा आहे अशा हौशी वाचकांनी त्यांचे एखादे पुस्तक किंवा किमान एखादा लेख तरी वाचलेला असतो. बी. ए. च्या अभ्यासक्रमात एक विषय इतिहास-लेखन-शास्त्र म्हणून असतो. त्यात एखादे प्रकरण तरी 'इतिहासकारां'च्या अभ्यासाचे असते. त्यात ज्या इतिहासकारांचा अभ्यास केला जातो ते सर्व जुने नि आता हयात नसलेले असतात. मात्र रोमीला थापर याला अपवाद आहेत. सद्यकाळात स्वत:च्या हयातीत ज्यांचा इतिहासकार म्हणून अभ्यासक्रमात समावेश होतो अशा इतिहासकार केवळ रोमीला थापर याच आहेत. अलिकडेच दि. ६ मार्च २०१६ रोजी त्यांनी 'इतिहास, राष्ट्रवाद आणि सांप्रदायिकता' या विषयावर एक व्याखान दिले. त्यावर मला काही आक्षेप नोंदवायचे आहेत. (सदर व्याख्यानाला कन्हैया प्रकरणाचा संदर्भ होता. मात्र त्यावर कोणतेही भाष्य इथे केलेले नाही.)
थापर म्हणतात की राष्ट्रवाद्यांना इतिहासाची एक प्रकारे 'तलफ' असते. ते त्याच्या आहारी गेलेले असतात.
ही गोष्ट अगदी खरी आहे, पण दुसर्या बाजूने असाही विचार करायला हवा की असं इतिहासाच्या ग्राउंडवर न खेळणारी विचार धारा कोणती आहे ? मला वाटतं सार्या वैचारिक युद्धांचं इतिहास हेच रणक्षेत्र आहे. त्यामुळे केवळ राष्ट्रवाद्यांना हा दोष देउन चालणार नाही.
इतिहासातील सुवर्णकाळाविषयी त्या लिहितात, पण प्रश्न असा अाहे की काहीच दोष नसलेला असा सुवर्णकाळ कोणत्या इतिहासकाराने रंगवलेला आहे ? मला वाटतं राष्ट्रवादी इतिहासकारांनीही अशी चूक केलेली नाही. (कार्यकर्त्यांची गोष्ट सोडून द्या.) इथं अजुन एक मुद्दा आहे. तो त्यांनी स्पष्टपणे मांडलेला नाही. पण आपण तो मांडू या. सुवर्णकाळाचा मुद्दा हा एकटा किंवा सुटा नसतो त्याला मूलतत्त्ववादाचा संदर्भ असतो. जेंव्हा एखादा मूलतत्त्ववाद उभा राहतो, आणि जर तो धार्मिक मूलतत्त्ववाद असेल तर त्याला काही गोष्टींची आवश्यकता असते. एक म्हणजे प्रमाण ग्रंथ आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतिहासात नोंदलेले आदर्श असे सुवर्णयुग. ते युग त्यांना पुनरुज्जीवित करावयाचे असते. (सध्याचे इसिस आणि त्यांची खिलाफत हे त्याचे नमुनेदार उदाहरण ठरावे.) आपल्या इतिहासकारांनी सुवर्णकाळाची भाषा केलेली असली तरी तो 'आदर्श' काळ होता नि तिकडे परत गेले पाहिजे; असा प्रचार कोणीही केलेला नाही.  वेदांना प्रमाण मानणार्या आर्य समाजीयांनी 'वेदांकडे परत चला' अशी घोषणा दिली असली तरी प्रत्यक्षात त्यांची चळवळ काल सापेक्ष विचार करता फारच प्रागतिक होती. सारांश सुवर्णकाळाच्या भाष्याविषयी राष्ट्रवादी इतिहासकारांनी 'फार' मोठा गुन्हा केला असं मानता येणार नाही. फार तर त्यांनी अतिशयोक्ती केली असा आरोप त्यांच्यावर लावता येइल व स्वातंत्र्यलढ्याचा संदर्भ पाहता तो क्ष्यम्यही मानता येइल. उलट भांडवलशाही नंतर येणारा समाजवाद हा सुवर्णकाळ असणार आहे, असे भविष्यपुराण मात्र डाव्या इतिहासकारांनी सांगितले आहे. उदा. डी. डी. कोसंबी आणि डी. एन. झा यांनी खरा सुवर्णकाळ हा भूतकाळात नसून तो भविष्य काळात असतो, असे स्पष्ट सांगितले आहे. खरं म्हणजे असं सांगणं इतिहासाच्या शिस्तीविरुद्ध आहे. पण एकदा थिअरी वर विश्वास ठेवायचा म्हटलं की मार्क्सचे इतिहासाचे पाचही टप्पे मान्य करावे लागतात. त्यातून भविष्य-पुराण जन्माला येते.
रोमीला थापर यांनी आर्यांच्या मूलस्थानाचाही विषय चर्चेसाठी घेतला आहे. या विषयाचं कसं राजकियीकरण झालेलं आहे, हेही त्या सांगतात. विशेषत: आर्यांच्या भारतीय उगमस्थानाविषयी कोणी प्रश्न उपस्थित केल्यास सोशल मिडीयावर त्या व्यक्तीला लोकांच्या क्रोध नि अपमानास सामोरे जावे लागते, असे त्यांनी म्हटले आहे. त्यात तथ्य आहे. आणि हे असहिष्णूपणाचे लक्षण आहे, असेच माझे मत आहे.
इथे प्रश्न असा अाहे की डावे इतिहासकार या बाबतीत (आणि अन्यही बाबतीत) सहिष्णू आहेत का ?
आर्यांच्या मूलस्थानाचा प्रश्न अतिशय गुंतागुंतीचा असून या प्रश्नावर अभ्यासकात फार मोठे रण माजलेले आहे. स्वत: थापर यांनी अलिकडेच एका भाषणात याविषयी निर्णायक भूमिका घेता येणार नाही असे सांगितले आहे. तरीही डावे इतिहासकार या प्रश्नावर असहिष्णू भूमिका घेतात, असेच दिसून येते. उदा. एखाद्या इतिहासकाराने 'आर्य मूळचे भारतातील असावेत' असा तर्क मांडला तर त्यावर चर्चा करण्याऐवजी सदर इतिहासकार प्रतिगामी असल्याचा शिक्का डावे मारतात व चर्चा टाळतात. दोन उदाहरणे देणे इथे अप्रस्तूत होणार नाही.
आर. एस. शर्मा यांनी NCERT चे ११ वी इतिहासाचे टेक्स्ट बुक लिहिले आहे. ते प्राचीन भारतावर आहे. त्यात आर्यांच्या मूलस्थानाची चर्चा आहे. आता खरं तर या विषयावर तज्ञांचे प्रचंड मतभेद आहेत. त्यामुळे टेक्स्ट बुक मधे विविध मत-मतांतरे सांगणे अपेक्षित असते. शेवटी हवे तर लेखकाने स्वत:चे मत सांगावे अशी साधारण पद्धत आहे. (आर्यांच्या मूलस्थानाविषयी मत-मतांतरे सांगा, असा एक प्रश्नच विचारण्याची पद्धत आहे.) पण शर्मा यांनी काय केले तर मत-मतांतरे दिलीच नाहीत. सरळ स्वत:ला मान्य असलेले एकमेव मत सांगून ते मोकळे झाले. नवख्या वाचकाला या विषयावर मत-मतांतरे आहेत, याचा पत्ता सुद्धा हे पुस्तक वाचून लागणार नाही. गंभीर वादग्रस्त विषयासंबंधी इतर अभ्यासकांची मते कळूसुद्धा न देणे ही एक प्रकारची असहिष्णूताच होय. पाठ्यपुस्तके किती एकांगीपणे लिहिली जातात, हेही त्यावरून समजते.
दुसरे उदाहरण म्हणजे अलिकडेच NBT ने एक पुस्तक प्रकाशित केले आहे. 'India : Historical Beginnings & the concept of Aryan' या नावाचा हा लेखसंग्रह २०० पृष्टांचा आहे. प्रस्तावना सोडल्यास यात चार लेख आहेत. यातही अर्थातच 'आर्यांचे मूलस्थान भारतीय' असं मानणार्या इतिहासकाराला स्थान मिळालेले नाही. ही बाजूच या ग्रंथातून नीट समोर येत नाही.वरील दोन्ही उदाहरणे मुद्दाम सरकारी प्रकल्पातील दिली आहेत. सर्व सरकारी इतिहास प्रकल्पात डाव्यांचीच लॉबी कार्यरत असल्याने ते केवळ त्यांचाच अजेंडा पुढे नेत असतात. उगीच आता सोशल मिडीया प्रभावी झाला आहे म्हणून बरं. नाही तर डाव्यांनी इतर विचारधारा पुरेपूर संपवण्याचा प्रयत्न केला होता.
रोमीला थापर यांनी या भाषणात काल-विभाजनाच्या समस्येलाही हात घातला आहे. ब्रिटिश इतिहासकार जेम्स मिल् याने भारताची हिंदु काल (प्राचीन), मुस्लीम काल (मध्ययुगीन) व ब्रिटिश काल (आधुनिक) अशी विभागणी केली. यात हिंदु-मुस्लीम विरोध गृहीत धरलेला आहे. त्यातूनच पुढे द्विराष्ट्रवाद जन्माला आला, अशी थापर यांची मांडणी आहे. साधारणपणे बहुतेक डाव्या इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की, भारतात मध्ययुगीन काळात हिंदु-मुस्लीम संघर्ष तीव्र नव्हता. जो होता त्याचे स्वरूप राजकीय व आर्थिक काय ते होते. आधुनिक काळात तो 'निर्माण' होण्याचं मुख्य कारण म्हणजे ब्रिटिशांचं राजकारण. विशिष्ठ प्रकारचं इतिहास लेखनही त्याचाच एक भाग होता. हिंदु काळ, मुस्लीम काळ असं म्हटल्यामुळं भांडणं वाढत गेली.
हे आकलन मुळात फार सदोष आहे असे मला वाटते. मुस्लीमांच्या आगमनानंतर भारतात खरोखरच मोठा फरक पडला असे मला वाटते. डाव्या इतिहासकारांच्या मते राज्यकर्ता कोणत्या धर्माचा आहे याने फार फरक पडत नाही; तर आर्थिक संरचना कोणती आहे, यामुळे मोठा फरक पडतो. उदा. गुप्त काळापासून क्रमाने सरंजामशाही वाढत गेली. तेंव्हा पासून मध्ययुग सुरू झाले, असे मानले पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. एक तर सरंजामशाहीचे स्वरूप आणि भारतात ती नेमकी कुठे कुठे होती हा मोठाच वादग्रस्त प्रश्न आहे. पण आपण हे म्हणणे खरे धरून चालू.  प्रश्न असा अाहे की भारतीय समाजात गंभीर स्वरूपाचे बदल नेमके कशामुळे झाले ? बदलत्या आर्थिक संरचनेमुळे की मुस्लीम राज्यकर्त्यांमुळे ? मला वाटतं की बदलत्या आर्थिक संरचनेमुळे समाज बदलत असला तरी त्याचं 'स्वत्व' टिकून राहतं. परंपरेचं सातत्यही टिकून राहतं. मात्र मुस्लीम राज्यकर्त्यांनी भारताचं इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न केला. भारत, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांग्लादेश अशा सांस्कृतिक टापूचा विचार केला; तर या इस्लामीकरणाच्या प्रयत्नात त्यांना सुमारे ३५% टक्के तरी यश आले. एवढी मोठी प्रजा मुस्लीम होणं हे काही कमी यश आहे असं मी मानत नाही. मुस्लीमांच्या पूर्वीही भारतावर कित्येक टोळ्यांची आक्रमणे झाली आहेत. पण त्या आक्रमणांचे स्वरूप वेगळे होते. भारतातल्या बहुविध धर्मात ते समाविष्ट झाले. हिंदु नावाचा एक धर्म इथं कधीच नव्हता. प्रत्येक टोळी/जात यांचा स्वतंत्र धर्म नि देवता होत्या. काळाच्या ओघात लोक एकमेकांच्या परंपरा नि देवता स्वीकारत गेले. याला मी हिंदुकरणाची प्रक्रिया असं म्हणेन. बाहेरून आलेले आक्रमकही या प्रक्रियेचा एक भाग बनले. मात्र इस्लामचे आक्रमण याला अपवाद होते. इस्लाम हाच एकमेव खरा धर्म अशी त्यांची धारणा असल्याने खोटे धर्म (जसे की हिंदु वगैरे) नष्ट करणे त्यांना कर्तव्य वाटत होते. धर्म ही संपूर्ण मानवी जीवन व्यापणारी गोष्ट असते. त्यामुळे धर्मपरिवर्तन ही गोष्ट आर्थिक संरचनेतील बदलांपेक्षा किती तरी मूलगामी गोष्ट आहे. खरा प्रश्न भारतीय धर्म आणि सेमेटिक धर्म (मुख्यत: इस्लाम व ख्रिस्ती) यातील फरक ओळखण्याचा आहे.
रोमीला थापर यांनी या भाषणात हिंदुत्ववादी विचारांचेही विश्लेषण केले आहे. परंतु ते फार ढोबळ रीतीने केले आहे. उदा. सावरकर नि संघ यात घोळ घातलेला आहे. त्यांच्या या विश्लेषणातून फक्त एक गोष्ट स्पष्ट होते की त्यांनी सावरकर वाचलेला नाही.
शेवटी त्यांच्या एका निरिक्षणांविषयी लिहून मी आपल्या प्रतिक्रियेला विराम देतो. एक निरिक्षण त्यांनी अचुक नोंदवले आहे, ते म्हणजे हिंदुत्ववाद्यांनी हिंदु धर्माचे सेमेटिकीकरण चालवले आहे. हा आरोप बहुतांश हिंदुत्ववादी गटांवर करता येण्यासारखा आहे. हिंदुंच्या सेमेटिकीकरणावर त्यांनी रास्त चिंताही व्यक्त केली आहे. पण यातील धक्कादायक भाग असा की जे धर्म खरोखरच सेमेटिक आहेत, त्यांच्याविषयी त्यांना नि इतरही बहुतांश पुरोगाम्यांना काहीही चिंता वाटत नाही.