भयग्रस्त पुरुषाची मुक्तता
- संतोष शेलार
खरंच पुरुष घाबरट असतात का किंवा घाबरलेले असतात का? या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी आहे. पुरुष हे स्त्रियांच्या तथाकथित लैंगिक क्षमतेला ‘आतून’ घाबरलेले असतात. त्यांना असं वाटतं की, स्त्रियांची लैंगिकता म्हणजे काही तरी अफाट प्रकरण आहे. त्यापुढे आपण ‘पुरुष’ म्हणून टिकाव धरू शकू की नाही, याबद्दल तो साशंक असतो. ही भीती आजची नाही, फार प्राचीन काळापासून आहे...
लेखाचं शीर्षक वाचूनच असं वाटण्याची शक्यता आहे की भयग्रस्त असेल तो पुरुषच कसला! कारण आपल्या परंपरेने ‘पुरुष’ नावाचा जो सांस्कृतिक साचा बनवला आहे, त्यात पुरुषाला घाबरायला बंदी आहे. पुरुष कसा निर्भय, कणखर नि पराक्रमी असायला हवा, असं आपल्याला हा साचा शिकवतो.
अर्थात परंपरेने कितीही ‘पुरुष’ घडवण्याचा प्रयत्न केला तरी वस्तुस्थिती फारशी बदलत नाही. किंबहुना अशा प्रकारे ‘पुरुष’ घडवावे लागतात, यात सर्व काही आले. खरंच पुरुष असे घाबरट असतात का किंवा घाबरलेले असतात का? या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी आहे. पुरुष हे स्त्रियांच्या तथाकथित लैंगिक क्षमतेला ‘आतून’ घाबरलेले असतात. त्यांना असं वाटतं की, स्त्रियांची लैंगिकता म्हणजे काही तरी अफाट प्रकरण आहे. त्यापुढे आपण ‘पुरुष’ म्हणून टिकाव धरू शकू की नाही याबद्दल तो साशंक असतो. या क्षमतेचं मिथक दोन प्रकारे पुढं येतं. एक म्हणजे स्त्रियांची कामभावना फार जास्त आहे म्हणजे असं की त्यांना वारंवार कामेच्छा होते. आणि दुसरं म्हणजे तिची लैंगिक क्षमताच अशी अफाट आहे की सहजासहजी तिची कामपूर्ती होणंच अशक्य! या धारणांचा परिणाम असा होतो की स्त्रीची कामपूर्ती आपण करू शकू की नाही, समजा नाही करू शकलो तर ती अन्य पुरुषांकडे आकर्षित तर होणार नाही ना, या भीतीखाली ते जगत असतात.
बरं, ही भीती आजची नाही, फार प्राचीन काळापासून आहे. उदाहरणार्थ आपले स्मृतिकार मनुमहाराज स्त्रियांविषयी काय लिहितात ते पाहा, ‘स्त्रियांची कामभावना अनिवार असते’ ‘प्रजापतीने स्त्रियांचा स्वभावच असा घडवला आहे की, पुरुष म्हटला त्यांस हवासा वाटतो, त्यात त्या पुरुषांचे वय अथवा रंगरूप पाहत नाहीत’ ‘स्त्रियांना त्यांच्या विषयासक्तीपासून रक्षिण्यासाठी रात्रंदिवस पुरुषांनी त्यांना आपल्या अधीन ठेवावे’ या सर्व विचारांतून मनु महाराजांनी स्त्रियांवर काय अन्याय केला, हा प्रश्न जरा बाजूला ठेवूया. या विचारांकडे नीट पाहिले तर लक्षात येईल की यातल्या वाक्यावाक्यातून पुरुषांच्या मनातली स्त्रीच्या लैंगिकतेविषयी असलेली भीती प्रकट झालेली आहे. या भीतीचे पडसाद जसे परंपरा-समर्थक वाङ्मयात उमटलेले आहेत, तसे परंपरेविरुद्ध विद्रोह करणाऱ्या वाङ्मयातही उमटलेले आहेत. चार्वाकांनी असे म्हटले आहे की, ‘पातिव्रत्य’ हे मूल्य चलाख व ‘दुबळ्या’ पुरुषांनी निर्माण केले आहे.’ यातले ‘दुबळ्या’ हे विशेषण चार्वाकांची मर्मदृष्टी स्पष्ट करणारे आहे. प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत ही अशीच परिस्थिती आहे. इंग्रज काळात जेव्हा स्त्री-शिक्षणाचा मुद्दा पुढे आला तेव्हा परंपरावादी पुरुषांनी असा युक्तीवाद केला की, ‘स्त्रिया शिकल्यास पर पुरुषास प्रेमपत्रे लिहितील.’ म्हणजे इथेही ‘ती’च भीती पुरुषांच्या मनात होती हे उघड आहे.
पुरुषांच्या मनातल्या स्त्रियांच्या लैंगिकतेविषयीच्या भीतीचे दोन भिन्न दिशेने गंभीर परिणाम झाले आहेत. पैकी एक दिशा म्हणजे लैंगिक बाबतीतल्या फसव्या औषधोपचारांच्या नादी लागणे. बहुतांश पुरुषांना असे वाटते की मोठ्या ‘आकारा’शिवाय नि जास्त वेळ ‘टिकल्या’शिवाय आपण स्त्रीची कामपूर्ती करू शकणार नाही. त्यामुळे ‘आकारा’ला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. मुलं मुलं एकत्र आली की तिथे लैंगिक विषयावरील चर्चा नेहमीच चालते, यात आश्चर्यकारक काही नाही. पण तिथे नेहमी चर्चिला जाणारा एक मुद्दा म्हणजे लिंगाचा आकार नि संभोगाचा कालावधी तसेच या दोन्हींमध्ये वाढ होण्यासाठी असणारी तथाकथित औषधे! या भयगंडाचाच आणखी एक परिणाम असा की या गंडामुळे पुरुष आपल्या साथीदाराबरोबर निरोगी लैंगिक संबंध ठेवू शकत नाहीत. कारण ते समागमाकडे ‘परफॉर्मन्स’ म्हणून पाहतात!
दुसऱ्या दिशेने झालेला परिणाम अधिक गंभीर आहे. भयग्रस्त प्राणी कित्येकदा आक्रमक बनण्याची शक्यता असते. आपली भयग्रस्तता लपवण्याच्या नादात पुरुष विलक्षण आक्रमक बनला आहे. स्त्रीला धाकात ठेवणे, प्रसंगी अत्याचार करणे हे त्याच्या ‘मर्द’पणाचे लक्षण बनले आहे. त्यातून स्त्रियांना घरातच ठेवण्यापासून ते बुरख्यापर्यंत विविध प्रथांना बळ मिळाले आहे. यातून स्त्रियांना काय काय त्रास होतो हा आज आपला विषयच नाही. पण पुरुषांना मात्र याचे तोटे भोगावे लागतात. तो स्वत:च्या ‘माणूस’पणाला व कित्येक तरल भावनांना मुकला आहे. आक्रमकता या पुरुषी मूल्याचं ओझं त्याला वागवावं लागतं.
खरं तर स्त्रीची कामभावना फार अफाट असते हे मिथकच आहे. आपण फार तर असं म्हणू शकतो की स्त्रीची लैंगिकता पुरुषांपेक्षा काहीशी भिन्न आहे. बस्स. पण या एका मिथकावर पुढची बरीच मिथकं उभी राहिली आहेत. ‘आकार’ नि ‘कालावधी’ यांचा बाऊ हा त्याचाच पुढचा भाग. खरं तर लैंगिक सुखात आकाराचं लहान-मोठेपण हा मुद्दाच नसतो. आणि कालावधीचं म्हणाल तर निसर्गाच्या पुढे फार जाता येत नाही. लैंगिक सुखात महत्त्वाची गोष्ट ठरते ती, एकमेकांविषयी असलेली ओढ आणि योग्य लैंगिक ज्ञान. केवळ या ज्ञानाच्या अभावीच हे पुरुष बिचारे, भयग्रस्त बनले आहेत.
‘पुरुष’ नावाच्या सांस्कृतिक साच्यातून समग्र मुक्त होण्याची प्रक्रिया ही दीर्घकालीन प्रबोधनानेच घडून येईल. मात्र या भयगंडातून मुक्त होण्यासाठी केवळ योग्य लैंगिक शिक्षणाची काय ती आवश्यकता आहे.
मार्च महिन्यात आपण ‘महिला दिन’ साजरा केला. त्या वेळी स्त्री-मुक्तीविषयी खूप काही लिहिले गेले. पण मुक्तीची आवश्यकता जशी स्त्रियांना आहे तशी पुरुषांनाही आहेच. नाही तरी आपण म्हणतोच ना की, स्त्री आणि पुरुष हे समानच असतात! परंतु त्यातल्या त्यात पुरुष हे अधिकच समान असतात, असे आमचा ‘आतला’ आवाज सांगत असल्याने आज पुरुषांच्या भयमुक्तीविषयी लिहिले आहे.
लेखकाचा संपर्क : santoshshilahar@rediffmail.com
- प्रथम प्रकाशित वर्तमानपत्र 'दिव्य मराठी' रसिक पुरवणी दिनांक २१ मे २०१७
No comments:
Post a Comment