Monday, 20 March 2017

गोहत्या-बंदी : काही विचार


गेल्या काही दिवसांत 'गोहत्या' या मुद्द्यावरून काही हिंसक घटना घडल्या आहेत. कुठे गोहत्येच्या संशयावरून दलितांना मारण्यात आले, कुठे अदिवासींना मारहाण झाली तर कुठे मुस्लिम महिलांना गोमांस बाळगल्याच्या संशयावरून मारझोड करण्यात आली. या घटनांचा निषेध करावा तितका थोडाच आहे. उशीरा का होइना पण पंतप्रधानांनी केलेल्या निषेधाचेही मी स्वागतच करतो. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, ही गोरक्षक मंडळी हिंदुत्ववादी आहेत आणि सरकारही हिंदुत्ववादी ! अशा वेळी सरकारची विशेष जबाबदारी आहे, या लोकांना आवरायची.

मुळात हा जो कायदा केला आहे तोच मुळी चुकीचा आहे. व्यक्तीच्या स्वांतत्र्यावर गदा आणणारा हा कायदा करणेच मुळी अयोग्य आहे. कुणी काय खावं हे सरकारने ठरवू नये. करण्यासारखी इतर खूप कामं आहेत.
आता मला हे समजते की 'व्यक्तीवाद'  (Individualism) हे मूल्य संघाला पेलवणे अशक्य आहे. मग निदान हिंदु-संघटनाच्या दृष्टीने तरी विचार करायचा होता. ज्याला आपण 'हिंदु समाज' म्हणतो ते म्हणजे विविध जाती, पंथ, नि धर्म इत्यादींचे एक कडबोळे आहे. त्यांचे आचार-विचार परस्परभिन्न आहेत. किंबहुना काही बाबतीत ते परस्परविरोधी सुद्धा आहेत. उदा. पुर्वोत्तर राज्यातल्या कित्येक जाती परंपरेनेच गोमांस-भक्षक आहेत. अर्थात संघाने कधीही हिंदु समाज, हिंदु परंपरा, धर्म यांचा गंभीरपणे अभ्यास करण्याचा प्रयत्न केला नाही. नाही तर असले हिंदुंना विघटित करणारे कायदे त्यांनी संमत केले नसते.

या सा-या प्रकरणांचा विविध निवडणुकांत भाजपाला काय तोटा होइल, त्याची गणितं कित्येक लोकांनी मांडली आहेत; पण हिंदु समाजाचं किती भयंकर नुकसान होतं आहे, हे कुणाच्या गावीही नाही. असे दिसते की बहुतांश हिंदुत्ववाद्यांना गाय ही पूज्य वाटते. गायीला हे पावित्र्य प्राचीन काळीच प्राप्त झाले असून क्रमाने ते वाढत गेलेले आहे. म्हणून तर कित्येक राजे-महाराजे स्वत:ला 'गो-ब्राह्मण प्रतिपालक' म्हणवून घेत. कारण गाय व ब्राह्मण ही जुन्या हिंदु धर्माची प्रतिकं होत. जुन्या साहित्यात 'गो-ब्राह्मण' असा एकत्रित शब्दबंध येतो. तो पावित्र्यदर्शक असतो. ( याचा व्यत्यास म्हणजे जुन्या साहित्यात 'स्त्री-शूद्र' असा शब्दबंध येतो. तो अर्थातच हीनार्थ-दर्शक असतो.) हिंदु समाजाचे आधुनिकीकरण करावयाचे असेल तर त्याची ही जुनी प्रतिकं अर्थातच बदलावी लागतील. 'ब्राह्मण' हे हिंदु समाजाचे प्रतिक आहे, असे आता सहसा कोणी म्हणणार नाही. पण गायीविषयी मात्र अद्यापही काही हिंदुंना तसे वाटू शकते. पण आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेत या मध्ययुगीन मानसिकता उध्वस्त कराव्या लागतील. ब्राह्मणांना सर्वसामान्य मानवाच्या पंक्तीला बसावे लागेल तर गायीला पशुंच्या !

या प्रश्नाला आर्थिक बाजू पण आहे. भाकड जनावरांचे काय करावयाचे हा प्रश्न शेतक-यांसमोर आहे. सरकारने या भाकड जनावरांची कसलीही सोय केलेली नाही. या कायद्याचे समर्थक मुख्यत: मध्यमवर्गीय शहरी बांधव आहेत. त्यांच्या मनात 'गोपालना'विषयी रोमॅंटिक कल्पना असाव्यात असे वाटते. काही शेतक-यांबरोबर बोलल्यामुळे असेही समजले की, आधुनिक संकरित गायींचे जे गो-हे (बैल) असतात; त्यांचा म्हणे शेतीला काहीही उपयोग होत नाही. मग त्यांना शेतक-यांनी उगाच पोसत रहावे का, हा प्रश्न आहे.

आता शेवटचा मुद्दा म्हणजे घटनेच्या मार्गदर्शक तत्त्वातील 'गोहत्या-बंदी' कलमाचा ! गोहत्याबंदीचा विषय निघाला की या कायद्याचे समर्थक हमखास या कलमाचा हवाला देतात. हे कलम बहुदा गांधीवादी प्रेरणेतून घटनेत आले आहे. हे कलम काहीसे संदिग्ध आहे, असेही मला वाटते. ते कसेही असो, पण व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर त्यामुळे अतिक्रमण होणार असेल, तर मात्र त्या कलमात सुधारणा करायलाच हवी. त्यासाठी व्यापक सहमती निर्माण करायला हवी. कारण शेवटी माणूस महत्त्वाचा आहे, गाय नव्हे ! 

No comments:

Post a Comment