Tuesday, 10 October 2017

|| समकालीन चर्चापद्धती व त्यांतील काही दोष ||

|| समकालीन चर्चापद्धती व त्यांतील काही दोष ||

सोशल मीडियाचा वापर क्रमाने वाढत आहे. त्याचा वापर केवळ मनोरंजनापुरता मर्यादित राहिलेला नसून आता तिथे गंभीर चर्चासुद्धा चालतात. सध्या सोशल मिडीयात ज्या चर्चा चालतात, त्या चर्चेच्या पद्धतीविषयी मला काही आक्षेप नोंदवायचे आहेत. हा लेख लिहिताना माझ्या डोळ्यासमोर मुख्यत: समकालीन व ऐतिहासिक प्रश्नावर चालणाऱ्या चर्चा अभिप्रेत आहेत. सोशल मिडीया म्हणताना मी व्हॉटस्अॅप, फेसबुक आणि ब्लॉग यावर चालणाऱ्या चर्चा गृहीत धरलेल्या आहेत. या माध्यमातून चालणाऱ्या चर्चांची खोली क्रमाने वाढत आहे. विशेषतः फेसबुक आणि ब्लॉग या माध्यमांची. उदाहरणच द्यायचे झाले तर असे देता येईल की, समजा शिवकालावर काही चर्चा सुरु आहे. तर मंडळी केवळ इतिहासकारांचे संदर्भ देऊन थांबत नाहीत तर कोणत्या मूळ साधनात (source) काय म्हटले आहे याचे संदर्भ ते देतील. जेधे शकावली अधिक विश्वसनीय आहे की शिवभारत यावर हिरीहिरीने चर्चा करतील. अमुक एक पत्र आता कसे बनावट ठरले आहे, हे कोणीतरी सांगेल तर ते अस्सल असल्याचे कुणी तरी पटवून देण्याचा प्रयत्न करील. अर्थात सर्वच मंडळी या पातळीवरून बोलतात असे नाही. सोशल मिडीयावर सर्व प्रकारचे लोक असतात. सोशल मिडीयाचे आणखीन एक वैशिष्ट्य असे की तिथे सर्वांना समान संधी असते. अभ्यास नाही अथवा कमी आहे म्हणून त्याने चर्चेत भाग घेऊ नये, असा काही नियम नाही. एखादा मोठा विचारवंत असो की सामान्य माणूस संधी समानच!
पहिला मुद्दा भाषेचा. बरीच मंडळी नीट मराठी लिहित नाहीत, असे मला वाटते. मी हे टायपींगमध्ये होणाऱ्या चुकांविषयी बोलत नाही. तसेच पहिली वेलांटी की दुसरी अशा चुकांविषयीही बोलत नाही. (प्रस्तुत लेखकाचेही शुद्धलेखन वाईटच आहे.) तसेच भाषा ग्रामीण की शहरी याविषयीसुद्धा मला काही म्हणायचे नाही. बऱ्याच वेळी वाक्याची रचनाच सदोष असते. शब्दांच्या वापराविषयी कित्येक वेळा असे लक्षात येते की 'तो' विशिष्ट शब्द वापरताना त्याच्या अर्थाच्या विविध 'छटा' लक्षात घेतल्या जात नाहीत. एखादा मराठी शब्द अथवा त्याच्या विविध छटा नीट न समजल्यास मराठी शब्दकोश उघडून पाहणं अथवा एखाद्या अधिकारी व्यक्तीकडून तो समजावून घेणं हा नित्य साधनेचा भाग असला पाहिजे. कारण भाषाच कच्ची राहिली तर कोणत्याही विषयाच्या अभ्यासाचा प्रारंभ होणे सुद्धा अशक्य आहे.
आणखी एक आक्षेपार्ह गोष्ट म्हणजे मोठे मोठे शब्द वापरण्याचा हव्यास. उदा. गाढे अभ्यासक, दिग्गज हे शब्द कित्येक वेळा गरज नसताना वापरले जातात. खरं तर बऱ्याचदा त्याची काहीच गरज नसते. साध्या, सरळ नि सोप्या शब्दांनी काम भागण्यासारखे असते.
अजून एक शंका मला अशी येते की कित्येक मंडळींचं लिखाण केवळ चुकीच्या अथवा भ्रष्ट अनुवादामुळे दुर्बोध झालेले असते. (किती तरी वेळा आपण मराठीतून इंग्लिश तर वाचत नाही आहोत ना, अशी शंका येत राहते.) मोठमोठ्या संकल्पना नि थिअरींचा हव्यास सोडला तर ते लिखाण कदाचित काही प्रमाणात सुलभ नि सुसह्य होउ शकले असते, असे वाटत राहते.
लिहिण्याच्या पद्धतीचा एक गंमतीदार भाग असा की बरीच मंडळी एका परिच्छेदात खूप सारे मुद्दे कोंबतात. त्यातून होतं काय की, कोणत्याच मुद्द्याला न्याय मिळत नाही. त्या भाष्यातून विविध मुद्द्यांविषयी तुमची 'मतं' कळतात, पण मुद्दे 'सिद्ध' मात्र होत नाहीत. उदा. असहिष्णुतेविषयी काही सांगायचे असेल तर अगदी चार्वाकांपासून ते नरेंद्र दाभोलकरांपर्यंत पंधरा वीस उदाहरणे एकाच परिच्छेदात दिली जातात. त्यातली सर्वच उदाहरणे सर्वांना पटण्यासारखी असतात, असेही नाही. त्यापेक्षा कमी मुद्द्यांवर तपशीलात लिहिणे अधिक चांगले. अर्थातच मुद्दा पुरेशा पुराव्याने नि तर्कसंगत युक्तीवादाने 'सिद्ध' करणं अधिक महत्त्वाचं!
सोशल मिडीयावर आढळणारा अजून एक दोषास्पद प्रकार म्हणजे कॉन्स्पिरसी थिअरीची लागण. वर दिलेले असहिष्णुतेचेच उदाहरण घेऊ. एकाच परिच्छेदात पंधरा वीस उदाहरणे दिली जातात. त्यात चार्वाक, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, छ. शिवाजी, संभाजी राजे ते नरेंद्र दाभोलकर इ. विविध कालखंडातील बरीच नावे असतात व या सर्वांची सरसकटपणे हत्या झाल्याचे सांगितले जाते. त्यावरून पुरोगामी विचारवंतांची हत्या करण्याची परंपरा आपल्याकडे कशी पूर्वापार आहे, हे ठासून सांगितले जाते. हे एक प्रकारचे सामान्यीकरण असते. यात काही उदाहरणे खरी, काही वादग्रस्त तर काही चक्क खोटी असतात.
कित्येकदा एखादी साधी गोष्ट सांगताना त्यात भरपूर पारिभाषिक संकल्पना नि कित्येक भिन्न भिन्न विचारव्यूह यांचा मारा केला जातो. यातून दोन चुका घडतात. एक तर त्या संकल्पना व विचारव्यूह पुरेशा काटेकोरपणे वापरलेले नसतात. दुसरा मुद्दा म्हणजे त्या सर्व संकल्पना नि थिअरींच्या गोंधळात तपशील हरवलेला असतो. अगोदर एखादा तपशील वाचकांपर्यंत नीट पोहोचवून नंतर त्यावर भाष्य करावे, असे केले जात नाही. त्यामुळे भाष्य तर वाचकांपर्यंत पोहोचते; पण ज्या तपशीलांवर ते उभे आहे तो तपशील मात्र पोहोचत नाही. याला एक कारण कदाचित असं असू शकेल की, सध्या अन्वयार्थाच्या तुलनेत तपशीलाचे इतके अवमूल्यन झाले आहे की, तो नीट सांगण्याची गरजच फारशी कोणाला वाटत नाही. कधी कधी तर अशीही शंका येते की ‘हे’ सर्व आम्हाला ‘अवगत’ आहे, असं दाखवायचं आहे की काय?
अजून एक दोष म्हणजे अमुक एका विचाराची योग्यायोग्यता त्या विचाराची चिकित्सा करून न ठरवता तो कुठुन आला आहे, कुणी मांडला आहे इ. मुद्द्यांवरून ठरविणे. जणु काही त्या विचारावर त्या त्या भागाचा, व्यक्तीचा किंवा संघटनेचा शिक्का मारलेला आहे!
काही लोकांस हेत्वारोपाची घाई झालेली असते. फार लवकर मंडळी समोरच्यावर हेत्वारोप करून रिकामी होतात. त्यातून समोरच्याचे म्हणणे सहानुभुतीपूर्वक समजूनच घेतले जात नाही. याच्या पुढची अवस्था म्हणजे एखाद्याला कुणाचा तरी 'हस्तक' म्हणून हिणवणे. या गोष्टींमुळे झालेय काय की मंडळी विशिष्ट मुद्द्यांविषयी प्रश्न विचारायला अथवा मतभेद व्यक्त करायला पण घाबरू लागली आहेत. उदा. काही गोष्टींबाबत प्रश्न विचारले अथवा मतभेद व्यक्त केले तर लोक आपल्याला ब्राह्मणी किंवा हिंदुत्ववादी म्हणतील की काय याचे टेन्शन असते. परिणामी खुलेपणाने चर्चा न होता साचेबद्ध चक्रातच मुद्दे फिरत राहतात. आणि मग कित्येक मुद्दे 'अवाजवी' बहुमताने संमत होतात.

हेत्वारोपाचाच पुढील विस्तार म्हणजे 'अनुक्त हेत्वारोप' होय. ('अनुक्त हेत्वारोप' हा शब्द श्री राजीव साने यांनी घडविला आहे.) म्हणजे असे की एखाद्याने जे लिहिले अथवा बोलले आहे, त्यावर लक्ष केंद्रित न करता त्याने न लिहिलेल्या अथवा न बोललेल्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून हेत्वारोप करणे. यासाठी एकावर एक अशी अनुमानांची चवडच रचली जाते. इथे हे लक्षात घ्यायला हवे की बोलल्या गेलेल्या गोष्टी नेहमी सान्त असतात; तर न बोलल्या गेलेल्या गोष्टीं अनंत असू शकतात. त्यामुळे 'हा' मुद्दा बोलला गेला तर 'तो' का नाही बोलला गेला, या म्हणण्याला फारसा अर्थ नसतो. काही जण तर अनुमानाच्या हनुमान उड्या मारत याच्याही पुढे जातात; नि न बोललेल्या मुद्द्यांविषयी सदर व्यक्तीचे मत कसे 'चुकीच्या' दिशेनेच जाणारे असू शकते, हे छातीठोकपणे सांगू लागतात.
आता तत्त्वत: हे मान्य करावे लागेल की अमुक लेखकाने तमुक मुद्दा जाणीवपूर्वक गाळला, अशी स्थिती असू शकते. पण मग तिथे आपल्याला अमुक लेखनात तमुक मुद्दा येणे कसे 'अनिवार्य' होते हे 'सिद्ध' करून दाखवावे लागेल. अडचण हीच आहे की आरोप खूप जण करतात, पण तो 'सिद्ध' करण्याची जबाबदारी मात्र अपवादानेच कुणी तरी स्वीकारते.
व्यत्यास खरा मानणे हा सुद्धा दोष आपल्याला इथे पहावयास मिळतो. उदा. समजा परंपरेचे अनुसरण करणारी एक विचारधारा आहे. तिला आपण प्रतिगामी विचारधारा म्हणू या. या विचारधारांवर टीका करणाऱ्या, त्याची चिकित्सा करणाऱ्या ज्या विचारधारा असतात त्यास पुरोगामी विचारधारा म्हणण्यात येते. पण चर्चेत बऱ्याचदा घडते काय की एखादा पुरोगामी विचारधारेची चिकित्सा करू लागला की, काही लोक त्यास प्रतिगामी ठरवून मोकळे होतात. इथे एक सोपे सूत्र वापरले जाते. ते म्हणजे प्रतिगामी विचारधारेची चिकित्सा करणारा तो पुरोगामी आणि पुरोगाम्यांची चिकित्सा करणारा तो प्रतिगामी! खरं म्हणजे पुरोगामी विचारांची चिकित्सा करणारा प्रतिगामी असेलच असे नाही. निदान तसे ठरायला नको. व्यत्यास खरा मानण्यात वैचारिक घोटाळा हा असतो की, तिथे दोनच पर्याय उपलब्ध आहेत, असे गृहीत धरले जाते; की जे खरे नाही. त्यामुळे व्यत्यास नेहमीच खरा असेल असे नाही.
कित्येकांना अभाववाचक विधाने करण्याची सवय असते. उदा. “गांधीजींनी अमुक एक विचार कधीच मांडला नाही.” आता इथे हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, ‘गांधीजींनी अमुक एक विचार मांडला’ असे विधान करणे फार सोपे आहे. कारण त्यासाठी गांधीजींचा एखादा लेख, भाषण किंवा चरित्र वाचणे पुरेसे आहे. पण अमुक विचार कधी मांडला नाही, असे विधान करण्यासाठी मात्र प्रचंड अभ्यास करावा लागेल. अशा प्रकारचं विधान करण्यासाठी त्यांचं समग्र व़ाड्मय, चरित्रं, आठवणी इ. सर्वच गोष्टी वाचाव्या लागतील. एखादा अधिकारी अभ्यासकच असे विधान करू शकेल.
काही फेसबुकीय विद्वानांना सारभूत विधानं करण्याची सवय असते. ते कित्येकदा फार मोठ्या कालखंडावर एका वाक्यात भाष्य करतात. उदा. ‘अहिंसावादामुळे गेली दोन हजार वर्षे भारताचे नुकसान होत आहे.’ खरं तर असे विधान करण्यासाठी फारच अभ्यास करावा लागेल. अशी फार मोठ्या कालखंडावर पकड असणारे इतिहासकार पण अपवादानेच आढळतात. आर. सी. मजुमदार हे एक असे विरळा इतिहासकार होते. अर्थात मजुमदारांइतका अभ्यास करा आणि मगच बोला असे इथे सुचवायचे नाही. पण अशी विधानं करताना आपल्याला आपल्या मर्यादांची जाणिव हवी. असे विधान करताना दोन हजार वर्षांच्या इतिहासाचा ‘किमान’ तपशील आपल्याला माहिती हवा. या कालखंडावर इतिहासकारांनी लिहिलेले महत्त्वाचे ग्रंथ वाचलेले असले पाहिजेत. एवढ्या मोठ्या कालखंडावरील अस्सल साधने अभ्यासणे फारच अवघड आहे. तेंव्हा अशी विधानं केलीच तर अतिशय जपून आणि नम्रपणे करायला हवीत. आता आणखी एका महत्त्वाच्या वाद-दोषाकडे वळू या. तो म्हणजे अखंडनीय विधाने करणे. कार्ल पॉपर यांनी 'शास्त्रीय' विधानाची कसोटी सांगितली आहे. त्यांच्या मते एखादे विधान खंडनीय असेल व अद्याप खंडित झालेले नसेल, तर ते विधान शास्त्रीय होय. म्हणजे विधान कोणकोणत्या प्रकारे खंडित केले जाऊ शकेल, याचा निकष विधान करणाराला पुरवता आला पाहिजे. उदा. समजा मी एखाद्या इतिहासातील घटनेविषयी तपशीलवजा विधान केले. तर ते विधान कोणत्या तरी पुराव्यावर आधारित असते (निदान असायला हवे.) मग ते विधान खोटे कधी ठरेल तर जेंव्हा एखादा नवा अधिक विश्वासार्ह पुरावा समोर आला तर किंवा जुना पुरावाच बनावट आहे, असे कुणी सिद्ध केले तर. अशा प्रकारे विधान खंडित होउ शकणारे निकष पुरवणं ही विधान करणाराची जबाबदारी आहे. बऱ्याचदा विशेषत: ‘थिअरी’वाली मंडळी अशी विधानं करतात की त्याविरुद्ध कितीही पुरावा दिला तरी ती खंडित होत नाहीत. जणु काही 'थिअरी' ही गोष्ट अपौरुषेय असते. अर्थातच अशी विधानं अशास्त्रीय असतात.
आता एक शेवटचा दोष. कित्येक मंडळी विधानं करत असताना ती अनाठायी आक्रमकपणे करत असतात. मला वाटतं आपल्याला हे भान असणं आवश्यक आहे की जे विधान आपण करत आहोत ते नेमके कशावर आधारलेले आहे. एखादा विषय असा असू शकेल की त्या विषयातील मूलभूत ग्रंथ आपण वाचलेले असू शकतील. त्याचे मूळ पुरावे आपल्याला माहिती असतील. त्याविषयी केली गेलेली चर्चा, विविध दृष्टीकोन आपल्याला अवगत असतील. मूळ पुराव्यांची ग्राह्याग्राह्यता, वेगवेगळ्या दृष्टीकोनांची योग्यायोग्यता आपण चिकित्सक मूल्यमापन करून ठरविलेली असेल व त्यावरून स्वत:चे काही मतही बनविलेले असेल. पण असे किती विषयांबाबत (खरं म्हणजे मुद्द्यांबाबत) असू शकेल? असलाच तर एखादा! एखादा विषय असाही असेल की त्याविषयी चार बुकं आपण वाचलेली असतात. त्यातही ते ग्रंथ जर अधिकारी व्यक्तींनी लिहिलेले असतील, तर आपल्याला त्या विषयाची बऱ्यापैकी ओळख होउ शकते. असेही काही बोटावर मोजण्याइतके विषय असू शकतात. पण जगात असे अनेक मुद्दे असतात की त्याची आपल्याला जुजबी माहिती असते. पण बहुतांश मंडळी जगातील यच्चयावत विषयांवर सारख्याच अधिकार वाणीने भाष्य करीत असतात. निदान ज्या विषयात आपल्याला कमी माहिती आहे त्या विषयांवर मत व्यक्त करताना ते फाजील आक्रमक तर होत नाही ना, याची काळजी घ्यायला हवी. ती विधानं अधिक काळजीपूर्वक, नम्र भाषेत नि सावधपणे करायला हवीत. अनाठायी आक्रमकपणा काय कामाचा?
हे मला दिसलेले काही महत्त्वाचे दोष आहेत. या क्षेत्रातील जाणकारांना आणखीही काही दिसू शकतील. मला वाटतं जर वरील दोष आपण टाळू शकलो तर चर्चा अधिक काटेकोर, तर्कशुद्ध व निर्द्वेष पद्धतीने करू शकू. व सोशल मिडीयातील चर्चेची खोली वाढविण्यास आपला हातभारही लागेल.
(पूर्वप्रसिद्धी – नवभारत ऑगस्ट २०१७)
लेखक - प्रा. संतोष शेलार
इतिहास विभाग, कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे महाविद्यालय, सटाणा.

Monday, 9 October 2017

भयग्रस्त पुरुषाची मुक्तता

                                                                                                                          - संतोष शेलार 
                                                                                                              

खरंच पुरुष घाबरट असतात का किंवा घाबरलेले असतात का? या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी आहे. पुरुष हे स्त्रियांच्या तथाकथित लैंगिक क्षमतेला ‘आतून’ घाबरलेले असतात. त्यांना असं वाटतं की, स्त्रियांची लैंगिकता म्हणजे काही तरी अफाट प्रकरण आहे. त्यापुढे आपण ‘पुरुष’ म्हणून टिकाव धरू शकू की नाही, याबद्दल तो साशंक असतो. ही भीती आजची नाही, फार प्राचीन काळापासून आहे...



लेखाचं शीर्षक वाचूनच असं वाटण्याची शक्यता आहे की भयग्रस्त असेल तो पुरुषच कसला! कारण आपल्या परंपरेने ‘पुरुष’ नावाचा जो सांस्कृतिक साचा बनवला आहे, त्यात पुरुषाला घाबरायला बंदी आहे. पुरुष कसा निर्भय, कणखर नि पराक्रमी असायला हवा, असं आपल्याला हा साचा शिकवतो.


अर्थात परंपरेने कितीही ‘पुरुष’ घडवण्याचा प्रयत्न केला तरी वस्तुस्थिती फारशी बदलत नाही. किंबहुना अशा प्रकारे ‘पुरुष’ घडवावे लागतात, यात सर्व काही आले. खरंच पुरुष असे घाबरट असतात का किंवा घाबरलेले असतात का? या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी आहे. पुरुष हे स्त्रियांच्या तथाकथित लैंगिक क्षमतेला ‘आतून’ घाबरलेले असतात. त्यांना असं वाटतं की, स्त्रियांची लैंगिकता म्हणजे काही तरी अफाट प्रकरण आहे. त्यापुढे आपण ‘पुरुष’ म्हणून टिकाव धरू शकू की नाही याबद्दल तो साशंक असतो. या क्षमतेचं मिथक दोन प्रकारे पुढं येतं. एक म्हणजे स्त्रियांची कामभावना फार जास्त आहे म्हणजे असं की त्यांना वारंवार कामेच्छा होते. आणि दुसरं म्हणजे तिची लैंगिक क्षमताच अशी अफाट आहे की सहजासहजी तिची कामपूर्ती होणंच अशक्य! या धारणांचा परिणाम असा होतो की स्त्रीची कामपूर्ती आपण करू शकू की नाही, समजा नाही करू शकलो तर ती अन्य पुरुषांकडे आकर्षित तर होणार नाही ना, या भीतीखाली ते जगत असतात.
बरं, ही भीती आजची नाही, फार प्राचीन काळापासून आहे. उदाहरणार्थ आपले स्मृतिकार मनुमहाराज स्त्रियांविषयी काय लिहितात ते पाहा, ‘स्त्रियांची कामभावना अनिवार असते’ ‘प्रजापतीने स्त्रियांचा स्वभावच असा घडवला आहे की, पुरुष म्हटला त्यांस हवासा वाटतो, त्यात त्या पुरुषांचे वय अथवा रंगरूप पाहत नाहीत’ ‘स्त्रियांना त्यांच्या विषयासक्तीपासून रक्षिण्यासाठी रात्रंदिवस पुरुषांनी त्यांना आपल्या अधीन ठेवावे’ या सर्व विचारांतून मनु महाराजांनी स्त्रियांवर काय अन्याय केला, हा प्रश्न जरा बाजूला ठेवूया. या विचारांकडे नीट पाहिले तर लक्षात येईल की यातल्या वाक्यावाक्यातून पुरुषांच्या मनातली स्त्रीच्या लैंगिकतेविषयी असलेली भीती प्रकट झालेली आहे. या भीतीचे पडसाद जसे परंपरा-समर्थक वाङ्मयात उमटलेले आहेत, तसे परंपरेविरुद्ध विद्रोह करणाऱ्या वाङ्मयातही उमटलेले आहेत. चार्वाकांनी असे म्हटले आहे की, ‘पातिव्रत्य’ हे मूल्य चलाख व ‘दुबळ्या’ पुरुषांनी निर्माण केले आहे.’ यातले ‘दुबळ्या’ हे विशेषण चार्वाकांची मर्मदृष्टी स्पष्ट करणारे आहे. प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत ही अशीच परिस्थिती आहे. इंग्रज काळात जेव्हा स्त्री-शिक्षणाचा मुद्दा पुढे आला तेव्हा परंपरावादी पुरुषांनी असा युक्तीवाद केला की, ‘स्त्रिया शिकल्यास पर पुरुषास प्रेमपत्रे लिहितील.’ म्हणजे इथेही ‘ती’च भीती पुरुषांच्या मनात होती हे उघड आहे.
पुरुषांच्या मनातल्या स्त्रियांच्या लैंगिकतेविषयीच्या भीतीचे दोन भिन्न दिशेने गंभीर परिणाम झाले आहेत. पैकी एक दिशा म्हणजे लैंगिक बाबतीतल्या फसव्या औषधोपचारांच्या नादी लागणे. बहुतांश पुरुषांना असे वाटते की मोठ्या ‘आकारा’शिवाय नि जास्त वेळ ‘टिकल्या’शिवाय आपण स्त्रीची कामपूर्ती करू शकणार नाही. त्यामुळे ‘आकारा’ला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. मुलं मुलं एकत्र आली की तिथे लैंगिक विषयावरील चर्चा नेहमीच चालते, यात आश्चर्यकारक काही नाही. पण तिथे नेहमी चर्चिला जाणारा एक मुद्दा म्हणजे लिंगाचा आकार नि संभोगाचा कालावधी तसेच या दोन्हींमध्ये वाढ होण्यासाठी असणारी तथाकथित औषधे! या भयगंडाचाच आणखी एक परिणाम असा की या गंडामुळे पुरुष आपल्या साथीदाराबरोबर निरोगी लैंगिक संबंध ठेवू शकत नाहीत. कारण ते समागमाकडे ‘परफॉर्मन्स’ म्हणून पाहतात!
दुसऱ्या दिशेने झालेला परिणाम अधिक गंभीर आहे. भयग्रस्त प्राणी कित्येकदा आक्रमक बनण्याची शक्यता असते. आपली भयग्रस्तता लपवण्याच्या नादात पुरुष विलक्षण आक्रमक बनला आहे. स्त्रीला धाकात ठेवणे, प्रसंगी अत्याचार करणे हे त्याच्या ‘मर्द’पणाचे लक्षण बनले आहे. त्यातून स्त्रियांना घरातच ठेवण्यापासून ते बुरख्यापर्यंत विविध प्रथांना बळ मिळाले आहे. यातून स्त्रियांना काय काय त्रास होतो हा आज आपला विषयच नाही. पण पुरुषांना मात्र याचे तोटे भोगावे लागतात. तो स्वत:च्या ‘माणूस’पणाला व कित्येक तरल भावनांना मुकला आहे. आक्रमकता या पुरुषी मूल्याचं ओझं त्याला वागवावं लागतं.
खरं तर स्त्रीची कामभावना फार अफाट असते हे मिथकच आहे. आपण फार तर असं म्हणू शकतो की स्त्रीची लैंगिकता पुरुषांपेक्षा काहीशी भिन्न आहे. बस्स. पण या एका मिथकावर पुढची बरीच मिथकं उभी राहिली आहेत. ‘आकार’ नि ‘कालावधी’ यांचा बाऊ हा त्याचाच पुढचा भाग. खरं तर लैंगिक सुखात आकाराचं लहान-मोठेपण हा मुद्दाच नसतो. आणि कालावधीचं म्हणाल तर निसर्गाच्या पुढे फार जाता येत नाही. लैंगिक सुखात महत्त्वाची गोष्ट ठरते ती, एकमेकांविषयी असलेली ओढ आणि योग्य लैंगिक ज्ञान. केवळ या ज्ञानाच्या अभावीच हे पुरुष बिचारे, भयग्रस्त बनले आहेत.

‘पुरुष’ नावाच्या सांस्कृतिक साच्यातून समग्र मुक्त होण्याची प्रक्रिया ही दीर्घकालीन प्रबोधनानेच घडून येईल. मात्र या भयगंडातून मुक्त होण्यासाठी केवळ योग्य लैंगिक शिक्षणाची काय ती आवश्यकता आहे.
मार्च महिन्यात आपण ‘महिला दिन’ साजरा केला. त्या वेळी स्त्री-मुक्तीविषयी खूप काही लिहिले गेले. पण मुक्तीची आवश्यकता जशी स्त्रियांना आहे तशी पुरुषांनाही आहेच. नाही तरी आपण म्हणतोच ना की, स्त्री आणि पुरुष हे समानच असतात! परंतु त्यातल्या त्यात पुरुष हे अधिकच समान असतात, असे आमचा ‘आतला’ आवाज सांगत असल्याने आज पुरुषांच्या भयमुक्तीविषयी लिहिले आहे.
लेखकाचा संपर्क : santoshshilahar@rediffmail.com
  • प्रथम प्रकाशित वर्तमानपत्र 'दिव्य मराठी'  रसिक पुरवणी  दिनांक २१ मे  २०१७